Congress Party President Election: ठरलं एकदाचं! राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत लढवणार काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणूक
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी आपण निवडणूक (Rajasthan, Congress President Election) लढविण्यास तयार आहोत, अशी पुष्टी गहलोत यांनी केली आहे.
प्रदीर्घ काळ संदिग्धता कायम ठेवल्यानंतर राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) अखेर निर्णयाप्रत आले आहेत. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी आपण निवडणूक (Rajasthan, Congress President Election) लढविण्यास तयार आहोत, अशी पुष्टी गहलोत यांनी केली आहे. गहलोत यांनी आगोदर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होते की, निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची तारीख ठरवण्यापूर्वी राहुल गांधींना (Rahul Gandhi) पक्षाचे अध्यक्ष होण्यासाठी आग्रह करणार आहोत. परंतू, राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे आता काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
अशोक गहलोत म्हणाले, "मी (काँग्रेस अध्यक्षपदासाठी) निवडणूक लढवणार हे निश्चित झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मी लवकरच तारीख निश्चित करेन. देशाची सध्याची स्थिती पाहता विरोधी पक्ष मजबूत असणे गरजेचे आहे, असेही गहलोत म्हणाले.. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Congress Party President Elections: काँग्रेस पक्षाध्यक्ष पदासाठी अधिसूचना जारी; शशि थरूर, अशोक गहलोत, दिग्विजय सिंह रिंगणात उतरण्याची शक्यता)
काँग्रेस पक्षात कोणीही एकपेक्षा अधिक पदे स्वत:कडे घेऊ नयेत, अशी भूमिका काँग्रेसने मध्यंतरी स्वीकारली होती. एकपेक्षा अधिक पदे स्वीकारण्याबाबत गांधी कुटुंबानेही मध्यंतरी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीहून अशोक गहलोथ काहीसे द्विधा मनस्थितीत होते.
अशोक गहलोथ हे राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत. आता त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची आहे. म्हणजेच त्यांना राजस्थानचे मुख्यमंत्री पद सोडावे लागणार. राजस्थानचे मुख्यमंत्री पद सोडल्यास सहाजिकच ते उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याकडे जाण्याचे थेट संकेत आहेत. त्यामुळे गहलोथ यांनी आपणास अध्यक्ष पद मिळाल्यास पायलट यांना मुख्यमंत्री होता येऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. सचिन पायलट यांच्यामुळेचे ते काहीसे अधिक अस्वस्थ होते असेही दिसले होते.