Rajasthan Assembly Session: सहा BSP आमदारांना पक्षाचा व्हिप जारी, अशोक गहलोत सरकारची अग्निपरिक्षा
मिश्रा यांनी आमदारांना दहावी अनुसूची कलम 2 (1) (ए) अन्वये व्हिप जारी केला आहे. या व्हिपमध्ये दहावी अनुसूची कलम 2 (1) (बी) अन्वये पक्षाच्या आदेशाचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
सचिन पायलट (Sachin Pilot) यांचे पक्षांतर्गत बंड आणि त्यानंतर निर्माण झालेली राजकीय स्थिती पाहता मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी सरकारचे गलबत मोठ्या कौशल्याने सांभाळले. अल्पमतात आले तरी सरकार कोसळले नाही. परंतू, धोका इतक्यावरच टळला नाही. आजपासून (शुक्रवार, 14 ऑगस्ट) राजस्थान विधानसभा पावसाळी अधिवेशन (Rajasthan Assembly Session) सुरु होत आहे. या अधिवेशनात अशोक गहलोत यांना बहुमत सिद्ध करावे लागू शकते. अशा वेळी गरज पडल्यास अशोक गहलोत बाहेरुन कुमक घेऊ शकतात. दरम्यान, गहोलत काही खेळी करु शकतात त्यामळे मायावती बहुजन समाजवादी पक्षाने (BSP) आपल्या सहा आमदारांना व्हिप जारी केला आहे. गेल्या वर्षी बसपाचे 6 आमदार काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. मात्र, बसपाने या आमदारांचे कृत्य बेकायदेशीर असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
बसपाचे महासचिव सतीश चंद्र मिश्रा यांनी हा व्हिप जारी केला आहे. मिश्रा यांनी आमदारांना दहावी अनुसूची कलम 2 (1) (ए) अन्वये व्हिप जारी केला आहे. या व्हिपमध्ये दहावी अनुसूची कलम 2 (1) (बी) अन्वये पक्षाच्या आदेशाचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. (हेही वाचा, बिहार: भाजप समर्थकांना बदडले, खासदारांनाही धक्काबुक्की? संतप्त पूरग्रस्तांचा कथीत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)
संदीप यादव, वाजिब अली, दीपचंद खेरिया, लखन मीणा, जोगेंद्र अवाना आणि राजेंद्र गुढा अशी व्हिप बजावण्यात आलेल्या बसपाच्या 6 आमदारांची नावे आहेत. या सहा आमदारांनी विधनसभा निवडणुकीत निवडूण आल्यानंतर काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. बसपाने हे प्रकरण पुढे उच्च न्यायालयात नेले मात्र हे प्रकरण प्रदीर्घ काळ न्यायप्रविष्ठ राहिल्यामुळे या प्रकरणात अत्याप कोणताही निर्णय झाला नाही.