Rajasthan: 35 वर्षांनंतर कुटुंबात जन्मलेल्या मुलीला हेलिकॉप्टरमधून आणले घरी; जंगी स्वागतासाठी वडीलांनी केला 4.5 लाखांचा खर्च
आजकाल काळानुसार या घटनांचे प्रमाण कमी नक्कीच कमी झाले आहे. त्यामुळे आता मुलीचा जन्मही आनंदाने साजरा होऊ लागला आहे. राजस्थानमधून अशीच एक खास घटना समोर येत आहे.
मुलगी झाली म्हणून नाकं मुरडणारी अनेक मंडळी आपण पाहिली असतील. काळानुसार या घटनांचे प्रमाण आता नक्कीच कमी झाले आहे. त्यामुळे आता मुलीचा जन्मही आनंदाने साजरा होऊ लागला आहे. राजस्थान (Rajasthan) मधून अशीच एक खास घटना समोर येत आहे. राजस्थानमधील एका कुटुंबाने नवजात बालिकेचे अगदी जंगी स्वागत केले. तिला चक्क हेलिकॉप्टर (Chopper) मधून घरी आणण्यात आले. बँड आणि गुलाबांच्या पायघड्या अंथरुन तिचे घरात जोरदार स्वागत केले. या ग्रँड सेलिब्रेशनचे कारणही तसं खास आहे. या कुटुंबात तब्बल 35 वर्षांनंतर मुलीचा जन्म झाला आहे. त्यामुळे आनंदाला पारावार न राहिलेल्या कुटुंबाने या सर्व स्वागताच्या तयारीसाठी तब्बल 4.5 लाख रुपये खर्च केले आहेत.
हेलिकॉप्टर उतरताना आणि चिमुकलीची झलक पाहण्यासाठी नागौर जिल्ह्यातील निंबडी चांदवटा येथील गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते. दोन महिन्यांपूर्वी या मुलीचा जन्म झाला असून ती तिच्या आजोबांच्या घरी होती. रामनवमीच्या शुभ मुहुर्तावर तिला तिच्या वडीलांच्या घरी आणण्यात आले. त्यावेळेस गावकऱ्यांना भजन गावून आणि फुलांचा वर्षाव करत मायलेकींचे स्वागत केले. (ठाणे: कोविड19 वर मात केल्यानंतर एका महिन्याने आईची तिच्या नवजात मुलीची घडली भेट)
मुलीचा जन्म झाल्यावर तिचे आजोबा मदन लाल कुमार यांनी बालिकेचे स्वागत जल्लोषात करायचे असे ठरवले होते. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून हेलिपॅड बनवण्याची परवानगी घेतली आणि त्यानंतर बालिकेचे आजोळ व मूळ घर असलेल्या गावांमध्ये हेलिपॅट्स उभारण्यात आले. या दोन्ही गावांमध्ये 30 किलोमीटरचे अंतर आहे. हेलिकॉप्टरने हे अंतर पार करण्यास 20 मिनिटे लागतात.
गावकऱ्यांच्या जल्लोषात मुलीचे वडील हनुमान राम प्रजापत यांनी मुलीला घेऊन हेलिकॉप्टरमध्ये प्रवेश केला. ते म्हणाले की, मुलीचा जन्म हा एका सणाप्रमाणे साजरा व्हायला हवा, असा संदेश मी या निमित्ताने सर्वांना देऊ इच्छितो. हनुमान प्रजापत यांच्या या कृतीने केवळ ग्रामीण राजस्थानसाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी एक उत्तम उदाहरण उभे केले आहे.