Raja Mansingh Encounter Case: राजा मानसिंह हत्याकांड प्रकरणी 35 वर्षांनंतर आला कोर्टाचा निकाल; 11 पोलिसांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा

या प्रकरणात, दोषी आढळलेल्या तत्कालीन पोलिस उपअधीक्षकांसह 11 पोलिसांना जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Raja Mansingh Encounter Case (संग्रहित संपादित प्रतिमा)

उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्हा कोर्टाने (Mathura District Court) राजस्थानमधील भरतपूर  (Bharatpur) येथील प्रसिद्ध राजा मानसिंह हत्याकांड (Raja Mansingh Encounter Case) प्रकरणात बुधवारी निकाल दिला. या प्रकरणात, दोषी आढळलेल्या तत्कालीन पोलिस उपअधीक्षकांसह 11 पोलिसांना जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचवेळी एका प्रकरणातील तीन आरोपींना निर्दोष सोडण्यात आले आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश साधना राणी ठाकूर यांनी या खटल्याची सुनावणी पूर्ण केल्यानंतर, मंगळवारी पोलिस उपअधीक्षक कानसिंह भाटी यांच्यासह 11 आरोपींना दोषी ठरविण्यात आले. आरोपपत्रातील 18 आरोपींपैकी डीएसपी कानसिंह भाटी यांचे चालक कॉन्स्टेबल महेंद्रसिंह यापूर्वीच निर्दोष सुटला होता आणि अन्य तीन आरोपी सैनिक नेकीराम, सीताराम आणि कुलदीप सिंह यांचा खटल्याच्या दरम्यान मृत्यू झाला होता.

डीएसपी कानसिंह भाटी, एसएचओ वीरेंद्र सिंह, राजस्थान कॉन्स्टेबल फोर्सचे हेड कॉन्स्टेबल जीवन राम, हेड कॉन्स्टेबल भंवरसिंह, हवालदार हरी सिंह, शेरसिंह, छतरसिंह, पद्म राम, जगमोहन आणि डीग पोलिस स्टेशनचे निरीक्षक रविशंकर मिश्रा आणि कॉन्स्टेबल सुखाराम यांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयात तैनात गुन्हे सहायक निरीक्षक कानसिंह सीरवी, हेड कॉन्स्टेबल हरिकिशन आणि कॉन्स्टेबल गोविंद प्रसाद यांना निर्दोष सोडण्यात आले. 21 फेब्रुवारी 1985 रोजीच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान 1700 तारखा देण्यात आल्या व 25 जिल्हा न्यायाधीश बदलले गेले.

जाणून घ्या नक्की काय आहे घटना -

या घटनेची सुरुवात 20 फेब्रुवारी 1985 रोजी होते. त्यावेळी राजस्थानमध्ये निवडणुकीचे वातावरण होते. तत्कालीन मुख्यमंत्री शिवचरण माथूर आपल्या उमेदवाराच्या समर्थनार्थ डीग येथे निवडणूक सभेला संबोधित करण्यासाठी आले होते. या सभेपूर्वीच कॉंग्रेसवाल्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकणार्‍या राजा मानसिंह यांचा ध्वज फाडला होता. तसेच माथूर यांनीही राजा मानसिंह यांच्याबाबत काही न रुचणारे उद्गार काढले होते. त्यावेळी चिडलेले राजा मान सिंह आपल्या जीपसह सभेच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी स्टेज तोडले. त्यानंतर आपल्या जीपने मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टरही तोडले. या दरम्यान परिसरात तणाव निर्माण झाले होते.

पोलिसांनी राजा मान सिंहविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. दुसर्‍या दिवशी 21 फेब्रुवारी 1985 रोजी राजा मान सिंह लाल कुंडा निवडणूक कार्यालयातून डीग पोलिस ठाण्यासमोरून जात होते, त्याचवेळी सीओ कानसिंह भाटीचा चालक महेंद्र याने आपल्या गाडीला मानसिंह यांच्या जोंगासमोर उभे केले. पोलिसांनी त्यांना मानसिंह यांच्या गाडीला घेराव घातला. यानंतर, लोकांना फक्त गोळीबाराचाच आवाज ऐकू आला. जोंगामध्ये बसलेल्या राजा मान सिंह यांच्या मृतदेहासह समर सिंह आणि हरीसिंह यांचे मृतदेह जोंगामधून बाहेर काढण्यात आले. या प्रकरणात मानसिंह यांच्या मुलीने 18 जणांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आली होती, त्यानंतर जवळजवळ 35 वर्षे हा तपास चालू होता आणि या तपासणीवर परिणाम होऊ नये, म्हणून मानसिंह यांच्या मुलीने सुनावणीला मथुरा कोर्टात वर्ग करण्याबाबत अर्ज केला होता. आता या प्रकरणात आज, 22 जुलै रोजी निकाल सुनावण्यात आला.

त्यावेळी या हत्याकांडामुळे राजस्थानमधील कॉंग्रेस सरकारविरूद्ध लोकांमध्ये असा संताप निर्माण झाला की, राजस्थानात कॉंग्रेसला मुख्यमंत्री बदलावा लागला होता.