Railway Fare Reduced: खुशखबर! रेल्वे प्रवास झाला स्वस्त;वंदे भारत आणि इतर ट्रेन तिकीट दरांमध्ये 25% पर्यंत कपात

ही सवलत त्वरित प्रभावाने लागू केली जाईल.

Indian Railways | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी, वंदे भारत, अनुभूती आणि विस्टाडोम कोचसह सर्व गाड्यांमधील एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे 25 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाकडून कढून काढण्यात आलेल्या परिपत्रकात हे म्हटले आहे. कपातीची व्याप्ती ही वाहतुकीच्या स्पर्धात्मक पद्धतींचे भाडे यावर अवलंबून असेल, असे देखील म्हटले आहे.  ट्रेनमध्ये जास्तीत जास्त जागांचं आरक्षण व्हावं, यासाठी भाड्यात कपात केली जाणार असल्याचं रेल्वेनं सांगितलं. रेल्वेचं भाडं आता स्पर्धात्मक पद्धतीने ठरवण्यात येणार आहे. (हेही वाचा - Uddhav Thackeray Vidarbha Tour: उद्धव ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर; बैठकांचा धडाका)

रेल्वेमधील आरामदायी सुविधांचा वापर प्रवाशांना करता यावा, या  दृष्टीने रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. एसी प्रवास सुविधा असलेल्या गाड्यांमध्ये सवलतीच्या दराची योजना लागू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास असणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना लागू होणार आहे. यामध्ये अनुभूती आणि व्हिस्टाडोम कोच असणाऱ्या रेल्वेंसह वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश आहे. या डब्यांमधील प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे, मूळ भाड्यावर 25 टक्क्यांपर्यंत सूट लागू केली जाणार आहे. आरक्षण शुल्क, सुपर फास्ट अधिभार, जीएसटी सारखे इतर शुल्क स्वतंत्रपणे आकारले जातील.

गेल्या 30 दिवसांत ज्या गाड्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी जागा आरक्षित आहे, अशा गाड्यांमध्ये सवलत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ही सवलत त्वरित प्रभावाने लागू केली जाईल. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही सवलत तात्काळ प्रभावीपणे लागू होणार आहे. अर्थात, ज्यांनी आधीच तिकीट बुक केलं आहे अशा प्रवाशांना भाड्याचा परतावा दिला जाणार नाही. वंदे भारतसह इतर सुपरफास्ट एक्स्प्रेसचं तिकीट हे फार जास्त होतं, त्यामुळे तिकीटांचे दर कमी करण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत होती.