Rahul Gandhi On Bilkis Bano Case: गुन्हेगारांचे कैवारी जगासमोर आले, बिल्किस बानो खटल्यावरुन राहुल गांधी यांची भाजपवर टीका
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे विरोधी पक्षांनी जोरदार स्वागत केले आहे.
Supreme Court Bilkis Bano Verdict: सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची लवकर सुटका करण्याच्या गुजरात सरकारच्या आदेशाला रद्दबातल ठरवले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे विरोधी पक्षांनी जोरदार स्वागत केले आहे. विरोधी पक्षाने हा न्यायाचा विजय असल्याचे म्हटले आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) नेहमीच महिलाविरोधीत भूमिका घेत असतो. इतकेच नव्हे तर गुन्हेगारांना प्रोत्साहन देत असतो असा आरोपीही विरोधकांनी केला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) या निर्णयावरुन भाजवला लक्ष्य करत गुन्हेगारांची खरे कैवारी कोर्टाच्या निर्णयामुळे पुढे आल्याचे म्हटले आहे. दरम्यान, याच प्रकरणात इंडिया आघाडीतील घटक पक्षांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
राहुल गांधी यांनी बिल्कीस बानो यांच्या संघर्षावर जोर देताना कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे "गुन्हेगारांचे आश्रयदाते" हे उघड झाले, असे म्हटले आहे. भाजप सरकारने केवळ निवडणुकीतील हित डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेतल्याची टीकाही त्यांनी केली आहे. प्रियंका गांधी वड्रा यांनीही राहुल गांधी यांच्याच मताशी मिळतेजुळते मत व्यक्त करत म्हटले की, भाजपच्या महिला विरोधी धोरणांचा प्रतिकार करत न्यायाचा विजय झाला आहे. प्रियंका यांनी बिल्कीस बानो यांच्या लढ्याबद्दल अभिनंतन केले. (हेही वाचा, Bilkis Bano Case: बिल्किस बानो प्रकरणात मोठा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाकडून दोषींची सुटका रद्द)
न्यायावर पीडित किंवा गुन्हेगाराच्या धर्माचा किंवा जातीचा प्रभाव नसावा - पवन खेडा
काँग्रेसचे मीडिया आणि प्रसिद्धी प्रमुख पवन खेडा यांनी अधोरेखित केले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने भाजपची महिलांबद्दलची असंवेदनशीलता उघड झाली आहे. त्यांनी दोषींच्या बेकायदेशीर सुटकेसाठी जबाबदार असलेल्यांवर टीका केली आणि सांगितले की न्याय प्रशासनावर पीडित किंवा गुन्हेगाराच्या धर्माचा किंवा जातीचा प्रभाव नसावा. (हेही वाचा, Bilkis Bano Case: बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली दोषींच्या सुटकेला आव्हान देणारी पुनर्विचार याचिका)
पंतप्रधान मोदी आणि भाजपने माफी मागावी- असदुद्दीन ओवेसी
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आणि आरोप केला की, महिला सक्षमीकरणाबाबत भाजपचे पोकळ दावे उघड झाले आहेत. त्यांनी अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि बिल्किस बानो आणि तिच्या कुटुंबीयांची पंतप्रधान मोदी आणि भाजपने माफी मागावी अशी मागणी केली.
जपला मिळालेली चपराक- टीएमसी
तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) हा निकाल म्हणजे भाजपला मिळालेली चपराक आहे, असे म्हटले आहे. भाजपने दोषींची सुटका आणि गौरव करण्यात मदत केल्याचा आरोपही टीएमसीने केला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे देश पातळीवरचे राजकारण ढवळून निघाले आहे.