Punjab: Reliance Jio च्या विरोधात शेतकऱ्यांचा राग; तोडले 1,500 हून अधिक मोबाइल टॉवर्स, जाणून घ्या नक्की काय आहे कारण
आज ही संख्या 1,500 च्या वर गेली आहे. जालंधरमध्ये जिओच्या फायबर केबलचे काही गठ्ठेही जाळण्यात आले आहेत. राज्यात जिओचे 9000 हून अधिक टॉवर आहेत. यामध्ये सर्वात जास्त नुकसान रिलायन्सचे झाले आहे
पंजाबमध्ये (Punjab) तीन शेती कायद्यांच्या विरोधात गेले अनेक दिवस आंदोलन चालू आहे. आता या आंदोलनाने अजून उग्र रूप धारण केलेले दिसून येत आहे. या शेती कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी 1,500 हून अधिक मोबाइल टॉवर्स (Mobile Phone Towers) तोडले आहेत. यामुळे काही भागात दूरसंचार सेवांवर परिणाम झाला आहे. सोमवारी सूत्रांनी ही माहिती दिली. नवीन कृषी कायद्यांचा अब्जाधीश उद्योजकांना सर्वाधिक फायदा होईल असा शेतकऱ्यांचा विश्वास आहे व म्हणूनच त्यांचा रोष मोबाइल टॉवरवर निघाला आहे. राज्यातील अनेक भागात या टॉवर्सचा वीजपुरवठा बंद पडला असून केबलही कापण्यात आली आहे.
या प्रकरणाची माहिती असलेल्या एका सूत्रांनी सांगितले की, ‘कालपर्यंत 1,411 टॉवर्स खराब झाले आहेत. आज ही संख्या 1,500 च्या वर गेली आहे. जालंधरमध्ये जिओच्या फायबर केबलचे काही गठ्ठेही जाळण्यात आले आहेत. राज्यात जिओचे 9000 हून अधिक टॉवर आहेत. यामध्ये सर्वात जास्त नुकसान रिलायन्सचे झाले आहे.’
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सोमवारी पोलिसांना, टॉवरला लक्ष्य केलेल्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, आतापर्यंत 1,561 मोबाइल टॉवर्सना लक्ष्य केले गेले आहे. राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये एकूण 21,306 मोबाइल टॉवर आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ते कोणत्याही किमतीत राज्यात अराजक निर्माण होऊ देणार नाहीत आणि कोणालाही कायदा हातात घेण्यास परवानगी दिली जाणार नाही.
सिंह यांनी शेतकर्यांना या गोष्टीचीही आठवण करून दिली की, ‘अशा प्रकारे दळणवळणाच्या स्त्रोतांचे नुकसान राज्यातील विद्यार्थ्यांकरिता हानिकारक ठरेल. विशेषत: कोविडच्या साथीमुळे अनेक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत आहेत तसेच अनेक लोक सध्या घरून काम करत आहेत, त्यांच्या कामांवर याचा परिणाम होऊ शकतो. राज्यातील इतर व्यावसायिक, ऑनलाईन व्यवहारांवर अवलंबून असलेली बँकिंग सेवाही यामुळे प्रभावित होऊ शकते.’