Pune Metro Line 3: पीएमओची तारीख मिळेना, आचारसंहिता आडवी आली; हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा मुहूर्त पुन्हा हुकला?
पंतप्रधान कार्यालयाकडून उद्घाटनाची तारीख न मिळणे आणि त्यातच विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या पुणे मेट्रो मार्ग ३ चे लोकार्पण पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकले आहे.
Pune Metro Line 3: पुणेकरांची विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची प्रतीक्षा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या मेट्रो मार्ग ३ च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच, आता या प्रकल्पावर आचारसंहितेचे सावट निर्माण झाले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) उद्घाटनाची निश्चित तारीख अद्याप मिळालेली नाही, त्यातच विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे या मेट्रोचे लोकार्पण पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आचारसंहितेमुळे उद्घाटनाबाबत संभ्रम
पीएमआरडीएने या मार्गावरील २३ पैकी १७ स्थानकांवर प्रवासी सेवा सुरू करण्याचे नियोजन केले होते. या सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव होता. मात्र, निवडणूक आयोगाने पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांची घोषणा केल्यामुळे आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात हा उद्घाटन समारंभ घेता येईल का, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
या संदर्भात पीएमआरडीएचे महानगर आयुक्त अभिजित चौधरी यांनी सांगितले की, पंतप्रधान कार्यालयाकडून उद्घाटनाची अंतिम तारीख अद्याप आलेली नाही. दरम्यानच्या काळात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या कालावधीत लोकार्पण सोहळा आयोजित करता येऊ शकतो किंवा नाही, याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मार्गदर्शन मागवण्यात येईल आणि निवडणूक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
१७ स्थानकांवर सेवा सुरू करण्याचे नियोजन
मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) २३ जुलै रोजी मान ते आर. के. लक्ष्मण म्युझियम (बालेवाडी) दरम्यानच्या पहिल्या १२ स्थानकांसाठी (सुमारे १३ किमी) तात्पुरती सुरक्षा मंजुरी दिली होती. त्यानंतर पीएमआरडीएने आणखी पाच स्थानके वाढवून एकूण १७ स्थानकांवर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
या वाढीव पाच स्थानकांच्या मार्गाची तांत्रिक पाहणी पूर्ण झाली असून, येत्या काही दिवसांत सुरक्षा आयुक्तांचा अंतिम अहवाल मिळण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात लक्ष्मी नगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि शिवाजीनगर ही सहा स्थानके बंद राहतील, कारण या भागातील कामे आणि वैधानिक परवानग्या अद्याप प्रलंबित आहेत.
आयटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा कायम
केंद्राच्या नवीन मेट्रो धोरणांतर्गत हा २३.२ किमी लांबीचा उन्नत मार्ग सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित केला जात आहे. हा मार्ग वाकड, बालेवाडी आणि बाणेरमार्गे हिंजवडी आयटी हबला मध्य पुण्यास जोडतो.
रस्त्यांवरील प्रचंड वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळण्यासाठी हा मेट्रो मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यापूर्वी जून आणि जुलै महिन्यांच्या नियोजित मुदती हुकल्या होत्या. आता उद्घाटनाची तारीख आणि निवडणूक आचारसंहितेच्या तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांना आणि प्रामुख्याने दररोज हिंजवडीला जाणाऱ्या नोकरदारांना मेट्रो प्रवासासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.