IPL Auction 2025 Live

Pulwama Attack Anniversary: पुलवामा दहशतवादी हल्ल्याला 1 वर्षे पूर्ण; अजूनही ताज्या आहेत जखमा, ज्याने देशाचा चेहरामोहरा बदलला

वर्षभरापूर्वीच्या या दिवसाचा इतिहास जम्मू-काश्मीरमधील एक अतिशय दुःखद घटना म्हणून नोंदविला गेला.

Pulwama Terror Attack list of martyred CRPF jawans (Photo Credits: CRPF India / Twitter)

14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) पुलवामा (Pulwama) येथे  झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे (Terror Attack) संपूर्ण  देश हादरला होता. वर्षभरापूर्वीच्या या दिवसाचा इतिहास जम्मू-काश्मीरमधील एक अतिशय दुःखद घटना म्हणून नोंदविला गेला. पुलवामा हल्ला ही देशासाठी फार मोठी शोकांतिका होती. आज या घटनेला 1 वर्षे पूर्ण होत आहे.

या दिवसाचे औचित्य साधून सीआरपीएफ शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहेत. यावेळी लेथेपोरा येथील शहीद स्मारकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सीआरपीएफचे विशेष महासंचालक जुल्फिकार हसन, काश्मीर विभागाचे महानिरीक्षक राजेश कुमार आणि वरिष्ठ अधिकारी व इतर सैन्य कर्मचारी लेथेपोरा येथील सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात पुलवामा येथे शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतील.

1 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी, जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यातील सीआरपीएफच्या (CRPF) जवानांवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सुमारे 40 जवान शहीद झाले होते. अवंतीपूराहून लष्कराचे जवान जात असताना त्यांच्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात IED चा वापर करण्यात आला होता. पुलवामा हल्ला ही अशी घटना आहे ज्यामुळे देशामध्ये राजनैतिक आणि सामजिक अनेक बदल घडले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या बालाकोट येथे भारतीय सैन्याने दहशतवाद्यांविरूद्ध मोठी कारवाई केली होती. मात्र आजही भारताच्या शहीद झालेल्या सुपुत्रांच्या आठवणीने देश हळवा होत आहे.

पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या कारवाईनंतर केंद्र सरकारने, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 चे विशेष स्थान रद्द केले. काश्मीरमधील पाकिस्तानचा हस्तक्षेप पूर्णपणे रोखण्यासाठी, फुटीरतावाद दूर करण्यासाठी आणि दहशतवादाच्या मुळांवर हल्ला करण्यासाठी. आधी असलेल्या बर्‍याच तरतुदी रद्द केल्या. याशिवाय जम्मू-काश्मीर दोन केंद्रशासित प्रदेशात विभागले गेले.

हा आत्मघाती हल्ला सुरक्षा दलांवर झालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. देशातील महत्वाच्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच ही घटना घडली होती. पण या घटनेनंतर लवकरच केंद्र सरकारकडून या घटनेविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले. लोकसभा निवडणुकीपूर्वी पुलवामा हल्ला हा मोठा मुद्दा बनला होता. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी संपूर्ण देश खदखदत होता. अशात, 26 फेब्रुवारीला बातमी आली की, रात्री तीन वाजेच्या सुमारास भारतीय हवाई दलाने मोठी कारवाई करत, पाकिस्तानमध्ये 100 किलोमीटर घुसून बालाकोटमधील, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी छावण्यांवर 1000 किलो बॉम्ब पाडले. ऑपरेशन बालाकोटमध्ये हवाई दलाची 12 मिराज लढाऊ विमाने वापरली गेली. (हेही वाचा: 'पुलवामा हल्ला हा पंतप्रधान मोदी यांनी निवडणुकीपूर्वी घडवून आणलेला पूर्वनियोजित कट' माजी राज्यपाल अजीज कुरैशी यांचा आरोप)

या हल्ल्यानंतर देशात पुन्हा एकदा राष्ट्रवाद उफाळून आला. याचा फायदा मोदी सरकारला झाला. लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीए सरकारने मोठा विजय मिळविला. पुढे 6 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरला दोन केंद्र शासित प्रदेशात विभागण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर झाले. हे विधेयक आणि ठराव पत्र संमत झाल्यानंतर, काश्मीरमधील परिस्थिती अधिकच बिकट झाली. त्या ठिकाणी बरेच दिवस कर्फ्यू राहिला. राज्यातील सर्व फुटीरवादी नेत्यांव्यतिरिक्त मुख्य प्रवाहातील नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दोन महिन्यांत सामान्य जीवन सुरळीत होत आहे,  परंतु नेत्यांवरील निर्बंध तसेच सुरू आहेत.

पुलवामा हल्ला हा दहशतवाद्यांकडून देशाच्या अस्मितेला फार मोठी ठेच होती, ज्याचा बदला देशाने घेतला. मात्र पुलवामा हल्ल्याची नेहमीच आठवण होत राहील, कारण याने देशाला फार मोठे दुःख दिले आहे. पण या घटनेने देशाचे राजकारण बदलले. ही अशी एक घटना आहे ज्यामुळे संपूर्ण जगात पाकिस्तानची निंदानालस्ती झाली व हळू हळू तो देश एकटा पडत गेला.