PUBG Game Addiction: पबजी गेमचे व्यसन, 16 वर्षाच्या मुलाने वडिलांच्या पिस्तुलातून गोळ्या झाडत केली आईची हत्या

सातत्याने पबजी गेम खेळत असल्यावरुन टोकल्याने आणि तो खेळण्यास विरोध केल्याने हा मुलगा संतापला होता. त्याने वडीलांच्या पिस्तुलातून आपल्या आईवर गोळ्या झाडल्या. या प्रकारात आईचा मृत्यू झाला.

Shooting | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

पबजी गेमचे व्यसन (PUBG Game Addiction) लागलेल्या एका अल्पवयीन मुलाने चक्क आपल्या आईची हत्या केली आहे. सातत्याने पबजी गेम खेळत असल्यावरुन टोकल्याने आणि तो खेळण्यास विरोध केल्याने हा मुलगा संतापला होता. त्याने वडीलांच्या पिस्तुलातून आपल्या आईवर गोळ्या झाडल्या. या प्रकारात आईचा मृत्यू झाला. ही घटना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्याची राजधानी लखनऊ (Lucknow) येथे घडली. घटनेची माहिती कळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली. तपास करण्यात आला. तपासादरम्यान 16 वर्षांच्या मुलाने आपल्या आईची गोळ्या झाडून हत्या केल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने या घटनेबाबत दिले.

लखनऊ पूर्वचे ADCP कासीम अबिदी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, आरोपी असलेला मुलगा 16 वर्षांचा आहे. त्याला पबजी गेम खेळणयाचे व्यसन होते. त्याच्या वसनामुळे त्याच्या आईला नेहमीच चिंता वाटत असे. त्यामुळे ती त्याला हा गेम खेळण्यास टोकत असे किंवा विरोध करत असे. ही घटना घडली त्या दिवशीही आईने मुलाला विरोध केला. त्यातून तो संतापला आणि त्याने आईवर गोळ्या झाडल्या. कासीम अबिदी यांनी माहिती देताना पुढे सांगितले की, आम्ही जेव्हा मुलाला ताब्यात घेतले तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र आम्ही सखोल चौकशी करताच त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली.

तरुणांमध्ये खास करुन अल्पवयीन युवकांमध्ये पबजी गेम खेळण्याचे व्यसन वाढत आहे. त्यातून टोकाचा अतिरेक, तिरस्कार आणि घृणाही त्यांच्या मनात निर्माण होताना दिसत आहे. यातूनच अनेक तरुणांनी आपल्या जवळच्या व्यक्ती, जसे की आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र अथवा शेजारी अशा लोकांच्या हत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. इतकेच नव्हे तर नैराश्येत येऊन अनेकांनी आत्महत्या केल्याच्याही घटना वारंवार पुढे आल्या आहेत. त्यामुळे तरुणाईमध्ये असलेले पबजी गेमचे व्यसन कमी व्हावे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.