दिल्ली: प्रक्षोभक विधाने करणाऱ्या भाजप नेत्यांवर गुन्हे का दाखल नाहीत? विचारणाऱ्या न्या. एस. मुरलीधर यांची तडकाफडकी बदली
1987 मध्ये ते उच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाले. 2006 मध्ये मुरलीधर यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सूत्रे हाती घेतली.
दिल्ली हिंसाचार प्रकरणात 'प्रक्षोभक विधाने करणाऱ्या भाजपच्या नेत्यांविरोधात अद्याप गुन्हा का नोंदवला नाही' असा थेट सवाल दिल्ली पोलिसांना विचारणाऱ्या न्यायमूर्ती एस मुरलीधर (Justice S Muralidhar) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायलयाच्या कॉलेजियमने 12 फेब्रुवारीलाच त्यांच्या बदलीची शिफारस केली होती. दरम्यान, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सर्वोच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या सल्ल्याने मुरलीधर यांना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात (Punjab & Haryana HC) पदभार सांभाळण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती मुरलीधर हे दिल्ली उच्च न्यायालयाचे तीसरे वरिष्ठ वकील आहेत. न्या. एस मुरलीधर यांची बदली करण्यात आल्यानंतर केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली आहे.
सीएए विरोधात आणि समर्थनार्थ सुरु असलेल्या आंदोलनाला दिल्लीत हिंसक वळण लागले. दिल्लीतील हिंसाचाराबाबत सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती एस मुरलीधर यांच्या निवासस्थानी बुधवारी मध्यरात्रीच सुनावणी झाली. या वेळी मुरलीधर यांनी 'प्रक्षोभक विधाने करणाऱ्या भाजपच्या नेत्यांविरोधात अद्याप गुन्हा का नोंदवला नाही' असा थेट सवाल दिल्ली पोलिसांना विचारला. तसेच, हिंसाचारात जखमी झालेल्या नागरिकांना पोलीस संरक्षणात मुस्तफाबाद येथील रुग्णालयात दाखल करावे. तसेच, जखमी नागरिकांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करुन द्यावा असेही आदेश न्यायालयाने या वेळी दिले. (हेही वाचा,दिल्ली हिंसाचार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी अखेर बोलले, शांतता, बंधुभाव राखण्याचे नागरिकांना अवाहन )
ट्विट
न्यायमूर्ती एस मुरलीधर यांनी सप्टेंबर 1984 मध्ये चेन्नई येथून आपली कारकीर्द सुरु केली. 1987 मध्ये ते उच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाले. 2006 मध्ये मुरलीधर यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सूत्रे हाती घेतली. विशेष म्हणजे या याचिकेवरील सुनावणी संपल्यानंतर काही तासाचत त्याच दिवसी रात्री साडे अकरा पावणेबाराच्या सुमारास न्या. मुरलीधर यांच्या बदलीचे आदेश आले.