Prahlad Modi Protests: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांचे दिल्लीत धरणे आंदोलन; जाणून घ्या कारण
रेशन व्यापाऱ्यांच्या मागण्या सातत्याने मान्य होत नसल्याने आम्ही संघटनेसोबत आंदोलन करणार असल्याचे त्यांनी काल सांगितले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे बंधू आणि ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनचे (AIFPSDF) उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) यांनी आज जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले. प्रल्हाद मोदी आणि इतर सदस्य जंतरमंतरवर जमले आणि संघटनेच्या मागण्यांबाबत घोषणाबाजी केली. यावेळी ते म्हणाले की AIFPSDF चे शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देणार आहे. संघटनेच्या मागण्या निवेदनात नमूद करून त्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचवल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
AIFPSDF च्या नऊ मागण्या आहेत, ज्यात तांदूळ, गहू आणि साखर तसेच खाद्यतेल आणि डाळी रास्त भाव दुकानांतून विकल्या गेलेल्या नुकसानाची भरपाई यांचा समावेश आहे. याशिवाय ते देशभर मोफत वितरणाचे 'पश्चिम बंगाल रेशन मॉडेल' लागू करण्याची मागणी करत आहेत. प्रल्हाद मोदी म्हणाले, AIFPSDF बुधवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेणार आहे, ज्यामध्ये भविष्यातील रणनीती ठरवली जाईल.
एआयएफपीएसडीएफचे राष्ट्रीय सरचिटणीस विश्वंभर बसू यांनी पीटीआयला सांगितले की, ‘आम्ही अशी मागणी करतो की खाद्यतेल, डाळी आणि एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा रास्त भाव दुकानांतून केला जावा. ग्रामीण भागातील रास्त भाव दुकानांच्या व्यापाऱ्यांना तांदूळ आणि गहू थेट खरेदी करणारे एजंट म्हणून काम करण्याची परवानगी द्यावी. टीएमसी खासदार सौगता रॉय यांनीही आमच्या मागण्या संसदेत मांडल्या होत्या.’
अशाप्रकारे रेशन व्यापाऱ्यांच्या मागण्यांबाबत प्रल्हाद मोदी निदर्शनात सहभागी झाले. रेशन व्यापाऱ्यांच्या मागण्या सातत्याने मान्य होत नसल्याने आम्ही संघटनेसोबत आंदोलन करणार असल्याचे त्यांनी काल सांगितले होते. प्रल्हाद मोदी स्वत: रेशन दुकानही चालवतात. ते म्हणाले की, 'कोरोनाच्या काळातही रेशन विक्रेत्यांनी लोकांपर्यंत रेशन पोहोचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, तर त्यांनाही कोरोना योद्धा म्हणून घोषित करावे.' (हेही वाचा: दिलासादायक! LPG सिलेंडरच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या कसे असतील नवे दर)
पीएम मोदींच्या भावाने सांगितले की, मी भावाच्या विरोधात नाही, संघटनेचा अध्यक्ष असल्याने मी या आंदोलनात सहभागी होणार. जेव्हापासून ही संघटना स्थापन झाली तेव्हापासून ते त्याच्याशी जोडले गेले आहेत, असोसिएशन जो काही निर्णय घेते त्याला मी पाठिंबा देईन. नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘ते कुटुंबापासून दूर राहतात, असो, भेटल्यानंतर मी त्यांच्याशी काय बोलणार. ते मुख्यमंत्री असताना असोसिएशनच्या वतीने दोनदा भेटले होते आणि एकदा भाऊ म्हणून भेटायला गेले होते. ते पंतप्रधान झाल्यापासून आम्ही त्यांना भेटलो नाही. जेव्हा ते आईला भेटायला येतात तेव्हा आम्ही तिथे उपस्थित नसतो.’