भाजप-सेनेला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात काँग्रेसची महाआघाडी

आगामी निवडणुकांबाबत आखणी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक मंगळवरी सायंकाळी पार पडली.

(Photo Credit: PTI)

मुंबई: राज्य आणि देशातील जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेस आगामी काळात समविचारी पक्षांशी महाआघाडी करणार आहे. आगामी निवडणुकांबाबत आखणी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक मंगळवरी सायंकाळी पार पडली. या वेळी आगामी निवडणुकांबाबतचे सुतोवाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. ही बैठक विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली.

काय म्हणाले खा. चव्हाण?

यावेळी बोलताना 'राज्य आणि देशातील जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेस आगामी काळात समविचारी पक्षांशी महाआघाडी करणार' असल्याचा पुनरुच्चारही खा. चव्हाण यांनी केला. समविचारी पक्षांसोबत महाआघाडी करण्याबाबत सहमती झाली असून, लवकरच इतर पक्षांशी याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचेही चव्हाण म्हणाले.

बैठकीला उपस्थित असलेले नेते

या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, सुनिल तटकरे, विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, माजी मंत्री नसीम खान, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.