PM Narendra Modi on Adani Issue: 'अदानी..अदानी..'च्या घोषणाबाजीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यसभेत प्रत्युत्तर, काय म्हणाले पाहा
यावरुन विरोधकांनी 'अदानी.. अदानी..' असे म्हणत पंतप्रधानांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. यावर पंतप्रधानांनी टोला लगावत तुम्ही आमच्यावर कितीही चिखलफेक केली तरी कमळ (भाजपचे चिन्ह) फुलणारच” असे म्हटले
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi on Adani Issue) यांनी आज राज्यसभेत उत्तर दिले. किमान आजच्या भाषणात तरी पंतप्रधान विरोधकांनी हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research) संस्थेच्या अहवालावरुन अदानी समूहाबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतील अशी आशा होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही अदानी प्रकरणावर मौन बाळगले. यावरुन विरोधकांनी 'अदानी.. अदानी..' असे म्हणत पंतप्रधानांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. यावर पंतप्रधानांनी टोला लगावत तुम्ही आमच्यावर कितीही चिखलफेक केली तरी कमळ (भाजपचे चिन्ह) फुलणारच” असे म्हटले.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात म्हटले की, सभागृहातील काही सदस्यांचे आचरण आणि स्वर संपूर्ण देशासाठी निराशाजनक आहे. मी अशा लोकांना सांगेन की 'जितना कीचड उठोगे, कमल उतना ही खिलेगा' (आमच्यावर जितका चिखल टाकाल, तितकी कमळ फुलेल). तुमची सगळ्यांची कमळ फुलवण्यात महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही त्याबद्दल विरोधकांचे आभार मानतो. हे सांगताना पंतप्रधानांनी एका हिंदी वचनाचा आधार घेत म्हटले की, "कीचड़ उसके पास है, मेरे पास गुलाल. जो भी जिसके पास था उसने दिया उचाल" (हेही वाचा, PM Narendra Modi On Adani Group Issue: अदानीच्या मुद्यावरुन राहुल गांधी यांच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? घ्या जाणून)
पंतप्रधानांनी भाषण सुरू करताच विरोधी सदस्यांनी सभागृहाच्या मध्यभागी (वेलमध्ये) धाव घेतली आणि अब्जाधीश गौतम अदानी यांच्या समूहाविरुद्धच्या आरोपांची संयुक्त संसदीय समिती चौकशीची मागणी केली. यूएस-स्थित शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर गौतम अदानी आणि त्यांचा समूह जोरदार चर्चेत आहे. तेव्हापासून विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि सरकारला धारेवर धरले आहे. समुहाद्वारे स्टॉक मॅनिपुलेशन आणि अकाउंटिंग फसवणूक केल्याच्या हिंडेनबर्गच्या आरोपानंतर विरोधकांनी या प्रकरणाची जेपीसीद्वारे चौकशी करावी अशी मागणी लावून धरली आहे.
दरम्यान, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदींवर गौतम अदानींचा उदय आणि अदानी समूहाच्या कंपन्यांना विविध क्षेत्रातील मदत केल्याचा आरोप केला आहे. काल, राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांनी लोकसभेतही अदानी प्रकरणावरुन जोरदार हल्लाबोल केला. मात्र, पंतप्रधानांनी त्याला कोणतेही उत्तर दिले नाही. उलट राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावरुन उपस्थित केलेले प्रश्न संसदीय कामकाजातून वगळण्यात आले.