पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या समवेत अनेक भाजप नेत्यांनी नावापुढे Chowkidar जोडत ट्विटरवरील नावात केला बदल
2014 मध्ये 'चायवाला' नंतर आता 2019 मध्ये 'चौकीदार' हा नवा फंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केला आहे.
2014 मध्ये 'चायवाला' नंतर आता 2019 मध्ये 'चौकीदार' हा नवा फंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सुरु केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या चौकीदार या टीकेवर सडेतोड उत्तर देण्यासाठी नरेंद्र मोदी स्वतःला चौकीदार म्हणवू लागले आहेत. आता तर त्यांनी ट्विटरवर आपले नाव बदलून 'चौकीदार नरेंद्र मोदी' (Chowkidar Narendra Modi) असे केले आहे. मोदींच्या पावलावर पाऊल ठेवत भाजपा अध्यक्ष अमित शहा (Amit Shah) यांनी देखील ट्विटर हँडलवर आपले नाव बदलत पुढे 'चौकीदार' लावले आहे.
कालच (शनिवार, 16 मार्च) मोदींनी 'मैं भी चौकीदार' गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत प्रचार अभियानाला सुरुवात केली. त्यानंतर हा नावातील बदल समोर आला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या व्यतिरिक्त पियुष गोयल, अमित मालवीय, जेपी नड्डा, रमन सिंग, पूनम महाजन यांच्या सह अनेक बड्या नेत्यांनी आपल्या नावापुढे चौकीदार लावले आहे. नरेंद्र मोदी यांच्या #MainBhiChowkidar या नव्या फंड्यावर राहुल गांधी यांचे खोचक ट्विट
राहुल गांधी यांच्या चौकीदार टिकेला तोडीस तोड उत्तर देण्याचा चंग जणू भाजपने बांधला आहे. 'मैं भी चौकीदार' हे गाणे शेअर करत मोदींनी भ्रष्टाचार, समाज्यातील वाईट गोष्टी, अस्वच्छता याविरुद्ध लढत असणारा आणि देशाच्या विकासासाठी झटत असलेला प्रत्येक भारतीय चौकीदार आहे, असे म्हटले आहे.