PM Modi's Schedule: पीएम नरेंद्र मोदींचा झंझावाती दौरा; अवघ्या 36 तासात करणार 5300 किमीचा प्रवास, 7 शहरांमध्ये 8 कार्यक्रमात होणार सहभागी

नंतर पंतप्रधान मोदी 25 एप्रिल रोजी कोची ते तिरुवनंतपुरम असा प्रवास करणार आहेत. पीएम मोदी तिरुअनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्टेशनवर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.

PM Narendra Modi (photo Credit - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 24 एप्रिलपासून दोन दिवसांच्या देशांतर्गत दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते 36 तासांत सात शहरांमधील आठ वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान या कालावधीत देशाच्या विविध भागात 5 हजार पेक्षा जास्त किलोमीटरचे अंतर कापतील. देशाच्या राजधानीपासून सुरुवात करून पंतप्रधान मोदी पहिल्यांदा मध्य भारतातील मध्य प्रदेशला भेट देणार आहेत. त्यानंतर ते केरळला भेट देतील. येथून दादरा व नगर हवेलीकडे रवाना होतील. शेवटी दमण आणि दीवमध्ये पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम आहे. तेथून ते दिल्लीला परततील.

पंतप्रधानांच्या या प्रदीर्घ कार्यक्रमाबाबत बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी 24 एप्रिलला सकाळी आपल्या दौऱ्याला सुरुवात करतील. सर्वात आधी पीएम मोदी दिल्ली ते खजुराहो असा 500 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. त्यानंतर ते खजुराहोहून रीवा येथे जातील. तेथे ते राष्ट्रीय पंचायती राज दिन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान पंचायत स्तरावर सार्वजनिक खरेदीसाठी एकात्मिक ई-ग्रामस्वराज आणि जेईएम पोर्टलचे उद्घाटन करतील. यात ठिकाणी ते सुमारे 17,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी करतील. येथून 200 किमीचा प्रवास करून ते खजुराहोला परततील.

खजुराहो येथून पीएम मोदी कोची येथे जाऊन यूथ कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होणार आहेत. नंतर पंतप्रधान मोदी 25 एप्रिल रोजी कोची ते तिरुवनंतपुरम असा प्रवास करणार आहेत. पीएम मोदी तिरुअनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्टेशनवर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर ते तिरुअनंतपुरम येथील सेंट्रल स्टेडियममध्ये 3,200 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. त्यानंतर सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली येथे 4,850 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि राष्ट्राला समर्पित करतील. नंतर पीएम  मोदी नमो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चला भेट देतील आणि यानंतर पंतप्रधान दमणमधील देवका बीचचे उद्घाटन करतील. (हेही वाचा: Death Threat To PM Modi: केरळ दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींना बॉम्ब हल्ल्याची धमकी; भाजप कार्यालयाला पाठवले पत्र, तपास सुरू)

येथून 110 किलोमीटरचे अंतर कापून ते सुरतला येतील. नंतर पंतप्रधान मोदी सुरतहून दिल्लीला परततील. अशाप्रकारे पंतप्रधान तब्बल 5,300 किमीचा हवाई प्रवास करतील. उत्तर ते दक्षिण भारत हा प्रवास पंतप्रधान मोदी अवघ्या 36 तासात पूर्ण करतील.