PM Modi's Meditation Trip: पीएम मोदींच्या कन्याकुमारी येथील ध्यानधारणा कार्यक्रमावरून गदारोळ; कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार, जाणून घ्या सविस्तर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.

PM Narendra Modi (PC - ANI/Twitter)

PM Modi's Meditation Trip: लोकसभा निवडणुकीच्या 2024 (Lok Sabha Election 2024) च्या शेवटच्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यातील निवडणूक प्रचार 30 मे रोजी सायंकाळी संपणार आहे. पीएम मोदी (PM Modi) 30 मे रोजी संध्याकाळी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियलला भेट देणार आहेत, जिथे ते ध्यानधारणा करतील. मात्र, आता पंतप्रधान मोदींच्या या कार्यक्रमावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीमध्ये तीन दिवस एकांतात ध्यान करण्याच्या एक दिवस आधी, काँग्रेसने बुधवारी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली.

पंतप्रधान मोदींचा ध्यानधारणेचा निर्णय आदर्श आचारसंहितेचे (MCC) उल्लंघन असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, 'आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले आहे की, मतदानापूर्वीच्या 48 तासांच्या शांततेच्या काळात कोणालाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रचार करण्याची परवानगी देऊ नये.'

पहा व्हिडिओ-

सिंघवी यांनी त्यांचा पक्ष कोणत्याही नेत्याच्या विरोधात नसल्याचेही स्पष्ट केले. ते म्हणाले की, ‘पक्ष कोणत्याची नेत्याच्या किंवा प्रचाराच्या विरोधात नाही. मात्र मतदानाच्याआधी 48 तासांमध्ये कोणीही प्रचार करू शकत नाही. पीएम मोदींनी 30 मेच्या संध्याकाळपासून 'मौन व्रत'ला बसणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र 30 मे रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून ते 1 जूनपर्यंत निवडणुकीचा शांतता कालावधी असेल. अशात मोदींचे मतदानापूर्वी मौन व्रताला बसने हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे.’ (हेही वाचा: Mamata Banerjee Dance Video: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सभेदरम्यान महिलांसोबत स्टेजवर केला डान्स)

सिंघवी यांनी टिप्पणी केली की, पंतप्रधानांनी एकतर प्रचार सुरू ठेवण्यासाठी किंवा स्वत:ला बातम्यांमध्ये ठेवण्याची ही रणनीती आहे. सिंघवी यांनी सांगितले की, त्यांनी निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की, पीएम मोदींना 1 जूनच्या संध्याकाळपासून मौन व्रत सुरू करण्यास सांगावे. परंतु मोदी ते उद्यापासूनच सुरू करण्याचा आग्रह धरत असतील, तर या मौन व्रताबाबतची कोणतीही माहिती छापील किंवा दृकश्राव्य माध्यमातून प्रसारित करण्यास मनाई करण्यात यावी.