Fit India Movement: लोकांचे आरोग्य उत्तम राहावे हाच 'फिट इंडिया अभियाना' चा उद्देश- पंतप्रधान मोदी
फिटनेस हे स्वस्त आणि समृद्ध जीवनाचे प्रतीक आहे असे सांगत मोदी सरकारने सुरु केलेले हे अभियान खूपच फायद्याचे असल्याचे मोदींनी सांगितले.
तमाम जनतेला राष्ट्रीय क्रिडा दिनाच्या शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये 'फिट इंडिया अभियाना' (Fit India) ची घोषणा केली. फिटनेस हे स्वस्त आणि समृद्ध जीवनाचे प्रतीक आहे असे सांगत मोदी सरकारने सुरु केलेले हे अभियान खूपच फायद्याचे असल्याचे मोदींनी सांगितले. या अभियानात क्रिडा विश्वासह कला क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती दर्शवली.
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी असे म्हणाले की, "फिटनेसचा संबंध हा थेट खेळाशी आहे. त्यामुळे फिटनेस हा एक शब्द नसून आरोग्यपूर्ण जीवनाची अटही आहे. तसेच हा जीवनाचा अविभाज्य घटकही आहे."
आजकाल लहान मुलांमध्ये मधुमेह यांसारखे आजार पाहायला मिळतात. जे आजार साधारणत: 50 शी नंतर यायचे ते आजार आता 30-35 वयोगटातील माणसाला होतात. याचे मुख्य कारण तो व्यक्ती योग्यरित्या फिट नसणे हे आहे. त्यामुळे प्रत्येकाने या धकाधकीच्या जीवनामध्ये फिटनेसलाही तितकेच महत्व दिले पाहिजे असेही मोदी म्हणाले.
सरकारच्या या 'फिट इंडिया' अभियानाला क्रिडा क्षेत्रातील दिग्गजांसह बॉलिवूडकरांनीही पाठिंबा दर्शविला. त्यात शिल्पा शेट्टीनेही आपला व्हिडिओ शेअर करत 'फिट इंडिया' अभियानात सहभागी होण्याचे लोकांना आवाहन केले आहे.
तसेच ज्याप्रमाणे तुम्ही 'स्वच्छ भारत अभियाना'ला यशस्वी केलात त्याप्रमाणे 'फिट इंडिया' अभियानाला ही करावे असे आवाहन मोदींनी तमाम भारतवासियांना केले.