पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जून रोजी 'गरीब कल्याण रोजगार अभियान' करणार लॉन्च; स्थलांतरीत मजूरांसह ग्रामीण भागांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा उद्देश
या स्थलांतरित मजूरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिब कल्याण रोजगार अभियान 20 जून रोजी लॉन्च करणार आहेत.
कोरोना व्हायरस (Coronavirus) पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक मजूर बेरोजगार झाले. या स्थलांतरित मजूरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गरीब कल्याण रोजगार अभियान (Garib Kalyan Rojgar Abhiyaan) 20 जून रोजी लॉन्च करणार आहेत. या अभियानाची सुरुवात बिहारच्या तेलीहार गावापासून होणार आहे. या व्हर्च्युअल लॉन्चिंग कार्यक्रमात पाच राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे संबंधित मंत्री सहभागी होतील.
6 राज्यांच्या 116 जिल्ह्यांमध्ये गरीब कल्याण रोजगार अभियान लॉन्च होणार असून सामान्य सेवा केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्याद्वारे सहभाग घेणे शक्य होईल. या कार्यक्रमात कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंगचे पालन करण्यात येईल. हे अभियान 125 दिवसांचे असणार आहे. यात 25 वेगवेगळ्या प्रकारची कामे स्थलांतरित मजूरांना देण्यात येतील. स्थलांतरित मजूरांना काम देण्यासोबतच ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे हा देखील या अभियानामागील उद्देश आहे. या अभियानासाठी सरकारकडून तब्बल 50 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.
ANI Tweet:
एकूण 6 राज्यातील 116 जिल्ह्यातील 25 हजार स्थलांतरित मजूरांना ही संधी उपलब्ध होणार आहे. यात बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे. या 27 महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांचा अंतर्भाव केला असून यातील 2/3 स्थलांतरित मजूरांना कामाची संधी मिळेल, असा यामागील हेतू आहे. गरीब कल्याण रोजगार अभियान हे 12 विविध विभाग आणि मंत्री यांच्या सहयोगातून लॉन्च करण्यात आले आहे.