Petrol-Diesel Price Today: सलग पाचव्या दिवशी वाढल्या पेट्रोल-डीझेलच्या किंमती, जाणून घ्या मुंबईसह देशातील महत्वाच्या शहरांमधील दर
तेलाची मागणी आणि पुरवठा या मुद्द्यावर केंद्र सरकार अनेक तेल निर्यातदार देशांशी बोलणी करत आहे, मात्र किमतीत तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता नाही
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) सलग पाचव्या दिवशी वाढ झाली आहे. यासोबतच देशभरात कच्च्या तेलाच्या किमतीदेखील विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. सरकारी मालकीच्या तेल कंपन्या IOC, HPCL आणि BPCL यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 35-35 पैशांची वाढ केली आहे. 35 पैशांच्या वाढीसह दिल्लीत पेट्रोलच्या दराने प्रतिलिटर 109.34 रुपये इतका उच्चांक गाठला आहे. डिझेलच्या दरातही 35 पैशांनी वाढ झाली असून राष्ट्रीय राजधानीत इंधनाचा दर 98.07 रुपये प्रति लिटर झाला आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर 115.15 रुपये तर डिझेलचा दर 106.23 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 109.79 रुपये तर डिझेलचा दर 101.19 रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 102.25 रुपये प्रति लिटर आहे. छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील जिल्हा बालाघाटमध्ये पेट्रोलच्या दराने नवा विक्रम केला आहे. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत 120.41 रुपये आहे, तर एक लिटर डिझेलसाठी 109.67 रुपये मोजावे लागत आहेत.
ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 25 दिवसांहून अधिक काळ वाढ झाली आहे. या महिन्यात पेट्रोल 7.45 रुपयांनी तर डिझेल 7.90 रुपयांनी महागले आहे. 1 ऑक्टोबर रोजी दिल्लीत पेट्रोल 101.89 रुपये प्रति लिटर होते तर डिझेलचे दर 90.17 रुपये प्रति लीटर होते. (हेही वाचा: Rules Change From 1st November: येत्या 1 नोव्हेंबर पासून 'या' नियमात होणार बदल, जाणून घ्या अधिक)
दरम्यान, तेलाची मागणी आणि पुरवठा या मुद्द्यावर केंद्र सरकार अनेक तेल निर्यातदार देशांशी बोलणी करत आहे, मात्र किमतीत तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने, पेट्रोलियम मंत्रालयाने सौदी अरेबिया, कुवेत, यूएई, रशिया आणि इतर सारख्या अनेक देशांच्या ऊर्जा मंत्रालयांना बोलावले आहे.