Parliament Winter Session: कृषी कायदे वापसीची केंद्राकडून तयारी, भाजप खासदारांना व्हिप जारी
येत्या सोमवारपासून (29 नोव्हेंबर) संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. आधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कृषी कायदा (Farm Laws Repeal Bill) मागे घेण्याचे संकेत आहेत.
वादग्रस्त कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. येत्या सोमवारपासून (29 नोव्हेंबर) संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. आधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कृषी कायदा (Farm Laws Repeal Bill) मागे घेण्याचे संकेत आहेत. त्यासाठी भाजपने (BJP) आपल्या सर्व खासदारांना संसदेत उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हिप (Whip) जारी केला आहे. हा व्हिप लोकसभेतील खासदारांना जारी करण्यात आला आहे. राज्यसभेतील खासदारांना भाजपने आगोदरच व्हिप जारी केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर हे लोकसभेत विधेयक सादर करतील. त्याच दिवशी सभागृहात कृषी कायद्याावर चर्चा होईल तसेच, हे विधेयक मंजूर केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबरला तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी या प्रस्तावास मान्यता दिली. (हेही वाचा, Farm Laws Repeal: कृषीविषयक तीन कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी)
काँगेसनेही काल रात्री आपल्या खासदारांना व्हिप जारी केला आहे. तीन ओळिंच्या या व्हिपमध्ये सोमवारी संसदेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. संसदेत सादर केल्या 26 विधेयकांच्या यादीत कृषी कायदा माघे घेण्याच्या विधेयकाचाही समावेश आहे. दरम्यान, पाठिमागील वर्षी सप्टेंबर महिन्यात पावसाळी अधिवेशनात तीन कृषी कायदे केंद्र सरकारने बहुमताने मंजुर केले होते. विरोधकांकडून तीव्र विरोध होऊनही हे कायदे सरकारने मंजूर केले. तेव्हापासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी या कायद्याचा विरोध करत आहेत. 26 नोव्हेंबर पासून सुरु असलेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी आपली एकटजूट कायम दाखवली.