Online Shopping Survey: महिलांपेक्षा पुरुष करतात ऑनलाइन शॉपिंगवर जास्त खर्च; फॅशनवेअरला पसंती, सर्वेक्षणात समोर आली माहिती
जयपूर, लखनौ, नागपूर आणि कोची यांसारख्या टियर-2 शहरांतील ग्राहक दिल्ली, मुंबई आणि चेन्नई सारख्या टियर-1 शहरांतील ग्राहकांपेक्षा फॅशन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर अधिक खर्च करत आहेत.
साधारण 2020 पासून कोविड-19 महामारीमुळे ऑनलाइन शॉपिंगची (Online Shopping) लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढली आहे. ऑनलाईन शॉपिंगमध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया जास्त खर्च करतात असा एक सर्वसामान्य समज आहे. मात्र नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात वेगळीच बाब समोर आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबादच्या संशोधनात सांगण्यात आले आहे की, भारतीय पुरुष महिलांपेक्षा ऑनलाइन शॉपिंगमध्ये जास्त पैसे खर्च करतात. या सर्वेक्षणात 25 राज्यांतील 35 हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता.
'डिजिटल रिटेल चॅनल्स अँड कन्झ्युमर्स: द इंडियन पर्स्पेक्टिव्ह' या शीर्षकाच्या अहवालात भारतीयांच्या ऑनलाइन शॉपिंगच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. अहवालात असे दिसून आले आहे की, 47% पुरुष आणि 58% महिला फॅशनवेअर पैसे खर्च करतात, तर 23% पुरुष आणि 16% महिला इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी खरेदी करतात. जयपूर, लखनौ, नागपूर आणि कोची यांसारख्या टियर-2 शहरांतील ग्राहक दिल्ली, मुंबई आणि चेन्नई सारख्या टियर-1 शहरांतील ग्राहकांपेक्षा फॅशन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर अधिक खर्च करत आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, या संशोधनात सहभागी पुरुष सरासरी 2,484 रुपये खर्च करत होते, तर महिला 1830 रुपये खर्च करत होत्या. अशाप्रकारे पुरुष 36 टक्के जास्त पैसे खर्च करत होते. होय, सरासरी स्त्रिया ऑनलाइन शॉपिंगवर कमी खर्च करत असतील, मात्र स्त्रिया पुरुषांपेक्षा ऑनलाइन शॉपिंगमध्ये जास्त वेळ घालवत आहेत. अहवालात असे दिसून आले आहे की, टियर-2 शहरांमधील ग्राहक विशेष फॅशन आणि पोशाख उत्पादनांवर सर्वाधिक दरडोई खर्च करतात. विशेष खरेदीमध्ये गुंतलेल्या ग्राहकांचे उच्च प्रमाण टियर-3 आणि टियर-1 शहरांमधून समोर आले आहे. (हेही वाचा: Man Dies During 'Smile Designing' Surgery: लग्नाआधी आपले 'हसणे' बदलण्याची डॉक्टरांकडे गेला तरुण; ‘स्माइल डिझायनिंग’ शस्त्रक्रियेदरम्यान झाला मृत्यू, हैदराबादमधील धक्कादायक घटना)
संशोधनात पुढे असे दिसून आले की, टियर-2, टियर-3 आणि टियर-4 शहरांमधील ग्राहक ऑनलाइन शॉपिंगवर अनुक्रमे 1,870 रुपये, 1,448 रुपये आणि 2,034 रुपये खर्च करत आहेत, तर टियर-1 शहरांमध्ये ग्राहक 1,119 रुपये खर्च करत आहेत. जवळजवळ 87% ग्राहक फॅशन उत्पादने आणि कपडे खरेदी करताना पेमेंट पद्धत म्हणून 'कॅश ऑन डिलिव्हरी' वापरत आहेत.