Officials Work Wearing Helmets: तेलंगणातील सरकारी कर्मचाऱ्यांवर हेल्मेट घालून काम करण्याची वेळ; व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या कारण (Watch)
कर्मचार्यांच्या समर्थनार्थ ते पुढे आले आहेत त्यांनीही कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित इमारतीची मागणी केली आहे. यासह अशा परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समर्पणाची प्रशंसा देखील केली आहे.
तेलंगणातील (Telangana) जगतियाल जिल्ह्यातील बीरपूर तालुक्यातील मंडल परिषद विकास अधिकारी (एमपीडीओ) कार्यालयातील सरकारी कर्मचारी हेल्मेट घालून काम करत आहेत. कार्यालयाच्या इमारतीच्या दुरवस्थेमुळे कर्मचाऱ्यांना चक्क हेल्मेट घालून काम करावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कर्मचारी हेल्मेट घालून काम करत आहेत. वृत्तानुसार, कार्यालयातील कर्मचारी धोकादायक परिस्थितीत त्यांच्या जिवाचा विचार न करता एका अशा जुन्या इमारतीत काम करत आहेत, जी राहण्यास अजिबात योग्य आणि सुरक्षित नाही.
कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, वेळोवेळी इमारतीच्या छताचे प्लास्टर खाली पडते. यापासून बचाव करण्यासाठी कर्मचारी कामावर हेल्मेट घालत आहेत. सुमारे 100 वर्षे जुनी इमारत असल्याने इमारतीचा काही भाग कोसळत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे इमारतीची अवस्था आणखीच बिकट झाली आहे. ही इमारत केवळ तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर पाहुण्यांसाठीही धोकादायक आहे.
इमारतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामासाठी हजेरी लावताना रोजच मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. एमपीडीओचा एक अधिकारी मरता मरता वाचला होता कारण इमारतीचा एक मोठा भाग त्याच्याजवळ पडला. कार्यालयाचे स्थलांतर अधिक सुरक्षित ठिकाणी करावे व चांगल्या सुविधा देणे याची मागणी कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून होत आहे. कर्मचार्यांनी वरिष्ठांकडे याबाबत तक्रार केली होती परंतु ती निष्फळ ठरली. अशा इमारतीमध्ये काम करण्याशिवाय पर्याय नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. (हेही वाचा: Bengaluru's Loss Due to Traffic: ट्रॅफिक जाममुळे बेंगळुरूचे दरवर्षी जवळजवळ 20,000 कोटी रुपयांचे नुकसान; अभ्यासात झाला खुलासा)
या कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटिझन्सही यावर प्रतिक्रिया देत आहेत. कर्मचार्यांच्या समर्थनार्थ ते पुढे आले आहेत त्यांनीही कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित इमारतीची मागणी केली आहे. यासह अशा परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समर्पणाची प्रशंसा देखील केली आहे.