Padma Awards 2022: पद्म पुरस्कार 2022 साठी 15 सप्टेंबर, 2021 पर्यंत नामांकने पाठवता येणार; जाणून घ्या कुठे दाखल कराल Nominations
कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यकशास्त्र, सामाजिक कार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग इत्यादी सर्व क्षेत्रे/प्रकार यामध्ये उल्लेखनीय आणि असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार देण्यात येतात
2022 च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकने/शिफारशी पाठवण्याची सुरुवात झाली आहे. ही नामांकने दाखल करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2021 आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकने/शिफारशी पद्म पुरस्कारांच्या https://padmaawards.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन दाखल करता येतील. 1954 पासून सुरू झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनी केली जाते. उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सन्मान करण्याचा या पुरस्कारांचा उद्देश आहे.
कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यकशास्त्र, सामाजिक कार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग इत्यादी सर्व क्षेत्रे/प्रकार यामध्ये उल्लेखनीय आणि असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार देण्यात येतात. समुदाय, व्यवसाय, पत किंवा लिंग याबाबत कोणताही भेदभाव न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. सार्वजनिक उपक्रमात डॉक्टर आणि वैज्ञानिक वगळता, सार्वजनिक उपक्रमांमध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी या पद्म पुरस्कारांसाठी पात्र नाहीत. (हेही वाचा: जनतेच्या शिफारसीच्या आधारे दिला जाणार 'पीपल्स पद्म पुरस्कार; नामांकन देण्याचे पीएम नरेंद्र मोदी यांचे आवाहन)
पद्म पुरस्कारांचे जनतेच्या पद्म पुरस्कारांमध्ये रुपांतर करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. म्हणूनच या पुरस्कारांसाठी आपल्या स्वतःच्या नामांकनासह नामांकने/ शिफारशी पाठवाव्यात अशी विनंती सर्व नागरिकांना करण्यात येत आहे. महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती आणि जमाती, दिव्यांग व्यक्ती आणि समाजाची नि:स्वार्थ सेवा करणाऱ्यांमधून खऱ्या अर्थाने सर्वोत्तम आणि असामान्य कामगिरी करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींची निवड करण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जावेत.
या नामांकनांमध्ये/शिफारशींमध्ये वर उल्लेख केलेल्या पद्म पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात सर्व तपशील समाविष्ट असला पाहिजे. शिफारस केलेल्या व्यक्तीच्या संबंधित क्षेत्र/प्रकारात उल्लेखनीय आणि असामान्य कामगिरीची माहिती या तपशीलामध्ये जास्तीत जास्त 800 शब्दांमध्ये कथन केलेली असली पाहिजे.