No Non-Veg Day in UP: उत्तर प्रदेशमध्ये 25 नोव्हेंबरला साजरा होणार ‘नो नॉन-व्हेज डे’; राज्यातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश

राज्यातील महापुरुषांचे आणि अहिंसेचे तत्व सांगणाऱ्या विविध कालखंडातील महापुरुषांचे जन्मदिवस आणि इतर धार्मिक सण ‘अभय’ किंवा ‘अहिंसा’ दिवस म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

योगी आदित्यनाथ (Photo Credit: PTI)

आतापर्यंत तुम्ही ‘ड्राय डे’बद्दल ऐकले असेल, मात्र आता उत्तर प्रदेशमध्ये ‘नो नॉन व्हेज डे’ साजरा होणार आहे. यूपीच्या योगी सरकारने शनिवार 25 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व कत्तलखाने आणि सर्व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने राज्यात 25 नोव्हेंबर हा दिवस 'नो नॉन व्हेज डे' म्हणून घोषित केला आहे. प्राण्यांची हत्या रोखण्यासाठी आयुष्यभर आंदोलन करणारे साधू टीएल वासवानी यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी राज्यभरात मांसाची दुकाने आणि कत्तलखाने बंद राहणार आहेत. नगरविकास विभागाने शुक्रवारी हा आदेश जारी केला.

विशेष सचिव धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी राज्यातील सर्व आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून या निर्णयाची माहिती दिली आहे. राज्यातील महापुरुषांचे आणि अहिंसेचे तत्व सांगणाऱ्या विविध कालखंडातील महापुरुषांचे जन्मदिवस आणि इतर धार्मिक सण ‘अभय’ किंवा ‘अहिंसा’ दिवस म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

(हेही वाचा: Gujarat Shocker: पगार मागणाऱ्या दलित तरुणाला केली बेदम मारहाण, तोंडात घातली चप्पल; महिला व्यावसायिकावर गुन्हा दाखल)

यामुळे महावीर जयंती, बुद्ध जयंती, गांधी जयंती आणि शिवरात्री यासह साधू टीएल वासवानी यांचा 25 नोव्हेंबर हा वाढदिवस मांसमुक्त दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. या दिवशी राज्यातील सर्वच ठिकाणी कत्तलखाने आणि मांसाची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे सर्वांनी काटेकोर पालन केले पाहिजे, असेही नमूद केले आहे. दरम्यान, याआधी शनिवारी, उत्तर प्रदेश सरकारने निर्यातीसाठी उत्पादित केलेल्या उत्पादनांना सूट देताना, हलाल प्रमाणपत्रासह अन्न उत्पादनांचे उत्पादन, साठवण, वितरण आणि विक्रीवर तत्काळ प्रभावाने बंदी घातली होती.