निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींच्या फाशीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया; शेवटी न्यायाचा विजय!
निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींच्या फाशीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सुद्धा एक खास ट्विट करून शेवटी न्यायाचा विजय झाला अशी भावना प्रकट केली.
2012 दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील (Nirbhaya Gangrape & Murder Case) चार ही दोषींना आज 20 मार्च रोजी सकाळी फासावर चढवण्यात आले. यानंतर देशभरात निर्भयाला सात वर्षांनी का होईना पण न्याय मिळाल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे. फाशीच्या नांतर दिल्लीवासीयांनी तिहार जेलच्या (Tihar Jail) बाहेर लाडू- पेढे वाटून आनंद साजरा केला, तर निर्भयाची आई आशा देवी यांनी सुद्धा आपल्या लेकीला न्याय मिळाल्याचे समदं साश्रू डोळ्यांनी व्यक्त केले. यावर अनेक राजकीय मंडळींच्या प्रतिक्रिया सध्या समोर येत आहेत, अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सुद्धा एक खास ट्विट करून शेवटी न्यायाचा विजय झाला अशी भावना प्रकट केली. देशातील महिला या प्रत्येक क्षेत्रात सक्षम आहेत आणि त्यांच्या सक्षमतेला समान संधी देणे हे देशाचे कर्तव्य आणि ध्येय आहे अशा आशयाचे भाव मोदींजीं ट्विटच्या माध्यमातून मांडले आहेत.
नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विट मध्ये निर्भयाला मिळालेला न्याय हा विजय आहे आणि महिलांच्या सन्मान आणि सुरक्षिततेसाठी हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे.असे लिहिले आहे. तर यापुढेही एकत्रितपणे, आपल्याला असे राष्ट्र निर्माण करायचे आहे जेथे महिला सबलीकरणावर लक्ष केंद्रित केले जाईल, जेथे समानता आणि संधी यांचा पुरस्कार केला जाईल, असा आशावाद सुद्धा मोदी यांनी व्यक्त केला.
नरेंद्र मोदी ट्विट
दरम्यान, निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषी म्हणजेच विनय शर्मा, अक्षय ठाकूर, मुकेश सिंह, पवन गुप्ता यांना आज तिहार जेल मध्ये फाशी देण्यात आली, त्यांचे मृतदेह सध्या दीनदयाळ उपाध्याय हॉस्पिटल मध्ये पोस्टमार्टम साठी धाडण्यात आले असून दुपारी 12 पर्यंत सर्व प्रक्रिया आटोपून त्यांच्या कुटुंबीयांकडे हे मृतदेह सोपवण्यात येणार आहेत.