Nirbhaya Gangrape-Murder Case: निर्भयाच्या दोषींना 1 फेब्रुवारी, सकाळी 6 वाजता होणारा फाशी; कोर्टाने जारी केले डेथ वॉरंट
त्यानंतर आता दिल्ली कोर्टाने आरोपींचे नवीन मृत्यूचे वॉरंट जारी केले आहे. त्यानुसार आता 1 फेब्रुवारी रोजी, सकाळी 6 वाजता दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात येणार आहे
तब्बल 7 वर्षांनतर निर्भया प्रकरणाचा (Nirbhaya Gangrape-Murder Case) ठोस निकाल समोर आला आहे. आरोपी मुकेश सिंह याची क्षमा याचना आज राष्ट्रपतींनी फेटाळून लावली, त्यानंतर आता दिल्ली कोर्टाने आरोपींचे नवीन मृत्यूचे वॉरंट जारी केले आहे. त्यानुसार आता 1 फेब्रुवारी रोजी, सकाळी 6 वाजता दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात येणार आहे.
याआधी 7 जानेवारी रोजी पटियाला हाऊस कोर्टाने दोषींचे डेथ वॉरंट जारी केले होते. त्यानुसार निर्भयाच्या चारही दोषींना 22 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता फाशी देण्यात येणार होती.
पहा एएनआय ट्वीट -
त्यानंतर, निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेशने दया याचिका दाखल केली होती. गुरुवारी रात्री दिल्ली सरकारने राष्ट्रपतींना ही दया याचिका पाठविली. तसेच सोबत ही दया याचिका नाकारण्याचीही शिफारसही सरकारने केली होती. आज राष्ट्रपतींनी ही याचिका फेटाळून लावली, यासह दोषी मुकेशचे सर्व कायदेशीर पर्याय संपले आहेत. अखेर दिल्ली न्यायालयाने त्यांचे डेथ वॉरंटही जारी केले आहे. त्यानुसार 14 दिवसांनी या प्रकरणातील चारही दोषींना फासावर लटकावले जाईल. याआधी तिहार जेल अधिकाऱ्यांनी शुक्रवारी फाशीच्या शिक्षेबाबत दोषींविरूद्ध फाशीचे वॉरंट जारी केले जावे, असे कोर्टाकडे अपील केले होते. (हेही वाचा: Nirbhaya Case: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळला दोषी मुकेश सिंह याचा दयेचा अर्ज; फाशीचा मार्ग मोकळा)
डेथ वॉरंट जारी झाल्यानंतर निर्भयाची आई आशा देवी यांनी, ‘जोपर्यंत दोषींना फाशी होत नाही, तोपर्यंत मनाला शांतता मिळणार नाही’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, निर्भया या 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर, 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला गेले. त्यानंतर तिच्यावर निर्घृण हल्ला केला. या घटनेनंतर 13 दिवसांनी सिंगापूरमधील रुग्णालयात उपचार घेत ती मरण पावली. या घटनेच्या तब्बल 7 वर्षानंतर व्यायालयाने हा निर्णय दिला आहे.