Dombivli Station परिसरात वाहतूक कोंडीवर ट्राफिक विभागाचा नवा तोडगा; 50 मीटर अंतरावर रिक्षांना मज्जाव

एखादा रिक्षा चालक हा नियम मोडून रेल्वे स्थानकाजवळ आला तर गस्तीवरील वाहतूक पोलीस संबंधित चालकाला दंड ठोठावणार आहेत.

Traffic Police (PC - wikimedia commons)

डोंबिवली स्टेशन (Dombivli Station) परिसरात वाहतूक कोंडी हा एक मोठा प्रश्न आहे. आता त्यावर तोडगा काढण्यासाठी वाहतूक पोलिस प्रशासन नवा मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करत आहेत. रेल्वे स्थानकात ये-जा करणार्‍यांची वाहातूक कोंडीतून सुटका करण्यासाठी रिक्षा चालकांना रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दारापासून  50  मीटर अंतरापर्यंत रिक्षा चालकांना मज्जाव केला जाणार आहे. वाहतूक विभागाच्या या निर्णयामुळे डोंबिवली पश्चिम पंडित दिनदयाळ चौक, विष्णुनगर जुन्या पोलीस ठाण्यासमोर होणाऱ्या रिक्षा चालकांच्या गर्दीतून सुटका होण्याची शक्यता आहे.

मागील आठवड्यामध्ये डोंबिवलीत वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी रेल्वे स्थानकासमोरील दार अडवून रिक्षा उभ्या करणाऱ्या, तेथून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर पोलीस निरीक्षक गित्ते यांनी रेल्वे स्थानकापासून किमान 50 मीटर अंतरावर रिक्षा चालकांना प्रवासी घेणे आणि सोडण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षी चालकांवर कारवाई देखील होणार आहे.

रिक्षा संघटनांनी देखिल वाहतूक विभागाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात प्रवासी सोडणे आणि घेण्याचे फलक वाहतूक विभागातर्फे महात्मा फुले रस्ता, घनश्याम गुप्ते रस्ता, पंडित दिनदयाळ रस्ता भागात लावण्यात आले आहेत. एखादा रिक्षा चालक हा नियम मोडून रेल्वे स्थानकाजवळ आला तर गस्तीवरील वाहतूक पोलीस संबंधित चालकाला दंड ठोठावणार आहेत. नागरिकांनीही या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचं पहायला मिळत आहे.