New Rules From Today: आजपासून होत आहेत 'या' नियमांमध्ये बदल; गाडीचा विमा, कर्जासह अनेक खर्चात होईल वाढ; जाणून घ्या तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम
केंद्र सरकारने मंगळवारी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) च्या प्रीमियममध्ये वाढ केली आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा प्रीमियम दर 330 रुपयांवरून 436 रुपयांपर्यंत वाढला आहे
दर महिन्याच्या 1 तारखेला अनेक नियम, उत्पादने आणि सेवांमध्ये बदल होत असतो. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. आजपासून जून महिना सुरू झाला आहे आणि आजपासून पाच मोठे बदल झाले आहेत. यामध्ये गोल्ड हॉलमार्किंग, एसबीआय गृह कर्ज, अॅक्सिस बँकेचे बचत खाते नियम आणि मोटार विम्यासाठी प्रीमियम दर समाविष्ट आहेत. हे नवीन नियम आजपासून लागू झाले असून, या सर्व बदलांचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर आणि तुमच्या खिशावर होईल. चला जाणून घेऊया एका तारखेपासून बदललेले नियम.
एसबीआय गृह कर्ज-
जर का तुम्ही एसबीआयकडून गृहकर्ज घेतले असेल, तर 1 जूनपासून तुमच्या खिशावर अतिरिक्त व्याजदराचा भार पडणार आहे. सोबतच जर तुम्ही बँकेकडून नवीन कर्ज घेणार असाल, तर त्याचे व्याजदर बदलले आहेत. ही गोष्ट घ्यानात घेऊनच त्यानुसार घर घेण्यासाठी तुमची बँक निवडा. एसबीआयने बाह्य बेंचमार्क कर्ज दरात 40 बेस पॉइंट्स किंवा 0.40 टक्के वाढ केली आहे. आता तो 7.05 टक्के झाला आहे.
मोटर विमा प्रीमियम-
मोटार विम्याचा हप्ता आता महाग होणार आहे. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे की, 1000 सीसी इंजिन क्षमतेच्या कारसाठी विमा प्रीमियम आता 2,094 रुपये असेल, जो कोविड-19 महामारीपूर्वी 2,072 रुपये होता. याशिवाय 1,000 सीसी ते 1500 सीसी इंजिन असलेल्या कारसाठी विमा प्रीमियम 3221 रुपयांवरून 3416 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
दुचाकींच्या बाबतीत, 150 सीसी ते 350 सीसी दरम्यानच्या वाहनांसाठी प्रीमियम 1,366 रुपये असेल, तर 350 सीसीपेक्षा जास्त वाहनांसाठी प्रीमियम 2,804 रुपये असेल.
गोल्ड हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा-
सोन्याच्या हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा 1 जूनपासून सुरू होणार आहे. आता 32 नवीन जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्र उघडण्यात येणार आहेत. यापूर्वी 256 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्रे होती. आता अशा एकूण 288 जिल्ह्यांमध्ये केवळ 20 ते 24 कॅरेटचे हॉलमार्क केलेलेच सोने विकले जाईल.
अॅक्सिस बँक बचत खाते-
अॅक्सिस बँकेने बचत खात्यांच्या सेवेवरील शुल्कात वाढ केली आहे. हे देखील 1 जूनपासून लागू होणार आहे. यामध्ये बचत खाती राखण्यासाठी आकारले जाणारे सेवा शुल्क देखील समाविष्ट आहे. यासोबतच अतिरिक्त चेकबुकचे शुल्कही आकारण्यात येणार आहे. सोबतच 1 जूनपासून बचत खात्यातील किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. या अंतर्गत, निमशहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना 15,000 ऐवजी किमान 25,000 रुपये किंवा अॅक्सिस बँकेच्या सर्व प्रकारच्या बचत खात्यांमध्ये 1 लाख रुपयांची मुदत ठेव ठेवावी लागेल. (हेही वाचा: काय सांगता? एका झटक्यात HDFC ने आपल्या 100 खातेदारांना बनवले कोट्याधीश; खात्यावर जमा केले 1300 कोटी रुपये)
PMJJBY आणि PMSBY प्रीमियम वाढला-
केंद्र सरकारने मंगळवारी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) च्या प्रीमियममध्ये वाढ केली आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा प्रीमियम दर 330 रुपयांवरून 436 रुपयांपर्यंत वाढला आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा वार्षिक प्रीमियम 12 रुपयांवरून 20 रुपये करण्यात आला आहे. हे नवीन प्रीमियम दर 1 जून 2022 पासून लागू होतील.
(The above story first appeared on LatestLY on Jun 01, 2022 08:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

