Negligence at Election Duty: मृत व्यक्तीची निवडणूक कामावर नियुक्ती; ड्युटीवर हजर न झाल्याने पगार कापण्याचे आदेश, प्रशासनाचा निष्काळजीपणा
ही माहिती सार्वजनिक झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेतील या दुर्लक्षाची चर्चा सुरू झाली.
उत्तर प्रदेशच्या मैनपुरी लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Mainpuri Lok Sabha constituency) मतदान कर्मचाऱ्यांच्या ड्युटीबाबत अतिशय निष्काळजीपणा घेतल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी सुमारे 6 महिन्यांपूर्वी मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीची ड्युटी निवडणुकीच्या कामांमध्ये लावण्यात आली. महत्वाचे म्हणजे, 5 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीच्या कामावर ज्या 50 कामगारांना गैरहजर घोषित करण्यात आले, त्यामध्ये या मृत व्यक्तीच्या नावाचा समावेश होता. या सर्वांच्या दोन दिवसांच्या पगार कपातीसह त्यांची पगारवाढ थांबविण्याचे आदेश देण्यात आले. न्यूज 18ने याबाबत वृत्त दिले आहे.
निवडणुकी ड्युटीबाबत विहित प्रक्रिया पाहिली तर, कोणत्याही व्यक्तीची निवडणूक कामांसाठी ड्युटी लागल्यावर त्याला आधी ड्युटी कार्ड दिले जाते. त्यानंतर त्याला प्रशिक्षित केले जाते आणि प्रशिक्षणानंतरच त्याला नियमित मतदान कर्मचारी म्हणून ड्युटीवर घेतले जाते. आता एखाद्या व्यक्तीचे आधीच निधन झाले असेल तर, त्याला ड्युटीवर कसे घेतले गेले? त्याला ड्युटी कार्ड कसे दिले गेले? त्याची प्रशिक्षण प्रक्रिया कशी पूर्ण झाली आणि मतदान कर्मचार्यांच्या यादीत त्याचे नाव कसे आले? हे असे काही प्रश्न अन्नुत्तरीत आहेत.
माहितीनुसार, सीडीओच्या स्तरावरून जारी करण्यात आलेल्या आदेशात, मृत हरि किशन यांना तृतीय मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांची ड्युटी पोलिंग पार्टी 110 ला देण्यात आली. परंतु त्यांचे आधीच निधन झाल्याने ते ड्युटीवर हजर राहू शकले नाहीत. आता सीडीओच्या आदेशानुसार, असे म्हटले आहे की, लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत, मतदान कर्मचाऱ्याने कर्तव्यावर गैरहजर राहून गंभीर गुन्हा केला आहे, ज्यासाठी त्याची वेतन कपातीसह वेतनवाढ थांबविण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांनी 4 व 5 डिसेंबर अशा दोन दिवसांचा पगार कापून, या मृत कर्मचाऱ्याला कर्तव्यावर गैरहजर असल्याचे घोषित केले. ही माहिती सार्वजनिक झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेतील या दुर्लक्षाची चर्चा सुरू झाली. हरी किशनचा या वर्षी 31 मे रोजी मृत्यू झाला होता व 10 जून रोजी हरिकिशनचे मृत्यू प्रमाणपत्रही जारी करण्यात आले होते. परंतु मैनपुरी लोकसभा जागेच्या पोटनिवडणुकीत तांत्रिकदृष्ट्या हरिकिशनला ड्युटी देण्यात आली. सीडीओ स्तरावर जारी करण्यात आलेल्या या आदेशाबाबत निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (हेही वाचा: विजय 'आप'लाच, 'झाडू ने केली कमाल, भाजपच्या कमळाचा पत्ता कट; काँग्रेसचा नाही हालला 'हात')
आता घडल्या प्रकाराबाबत राजकीय दोषारोप सुरु झाले आहेत. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी हे निष्काळजी असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोपाळ यादव यांनी केला. 31 मे 2022 रोजी मृत्यू झालेल्या व्यक्तीला डिसेंबर 2022 मध्ये निवडणूक ड्युटी देण्यात येते, त्याचा पगार कापून वेतनवाढ थांबवण्यात येते, ही अतिशय गंभीर बाब असल्याचे सांगितले.