NEET-UG, JEE Mains 2020 Exams: महाराष्ट्र सह 6 राज्यांच्या मंत्र्यांची जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
भारतामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना NEET-UG आणि JEE Mains 2020 च्या परीक्षा घेतल्या जाऊ नयेत यासाठी महाराष्ट्र सह देशातील 6 राज्यांच्या मंत्र्यांकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र आज कोर्टाने त्या फेटाळून लावल्या आहे. 17 ऑगस्ट दिवशी सुनावणी करताना कोर्टाने ठरलेल्या वेळापत्रकानुसार, देशभर जेईई मेन्स आणि नीट 2020 ची परीक्षा होईल असं म्हटलं होतं. दरम्यान देशात 1 सप्टेंबर पासून जेईई मेन्स परीक्षा सुरू झाली आहे. त्या 6 सप्टेंबर पर्यंत घेतल्या जातील.
महाराष्ट्र (Maharashtra), छत्तीसगढ (Chhattisgarh), राजस्थान (Rajasthan), पंजाब (Punjab), झारखंड (Jharkhand) आणि पश्चिम बंगाल (West Bengal) या 6 राज्यातील मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. जेईई आणि नीट मिळून देशात यंदा सुमारे 27 लाख विद्यार्थी बसले आहेत. त्यांचे आरोग्य कोरोना संकटात धोक्यात येऊ शकते. त्यांच्यासोबतच कुटुंबीयांनादेखील कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे अशी भीती व्यक्त करण्यात आली होती मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.
ANI tweet
विद्यार्थ्यांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये तसेच लॉजिस्टिकच्या दृष्टीने देखील मोठा खर्च होऊ शकतो ही भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे एनटीए देखील परीक्षा घेण्यावर ठाम आहे.
मुंबईमध्ये जेईई आणि नीटच्या विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळात प्रवासासाठी विशेष सवलत आहे. त्यांच्यासोबत पालकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. पश्चिम रेल्वेनेही मुंबईत ट्रेन्सच्या फेर्या वाढवल्या आहेत.