पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे National Cow Commission चा सल्ला- 'गायीच्या शेणापासून तयार होणारा CNG वापरा'
तो सिलिंडरमध्येही भरू शकतो आणि स्वयंपाकासाठी वापरला जाऊ शकतो. शेणापासून मिळणारी उर्जा वाहतुकीसाठीही वापरली जाऊ शकते
मागील वर्षी जगभर कोरोना साथीचा रोग पसरला, ज्यामुळे अर्थव्यवस्था रुळावर येण्यास बराच कालावधी लागला. दरम्यान, 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पामध्ये महागाईबाबत दिलासा मिळेल, अशी लोकांना आशा होती, पण झाले ते उलटेच. गेल्या दोन आठवड्यांपासून पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती (Fuel Prices) सातत्याने वाढत आहेत. देशभरातून पेट्रोलच्या दरवाढीच्या तक्रारी येत असताना, लोकांनी इंधन म्हणून शेण (Cow Dung) वापरावे अशी सूचना राष्ट्रीय गाय आयोगाने (National Cow Commission) केली आहे. पेट्रोलच्या महागाईपासून शेण मोठ्या प्रमाणात दिलासा देईल. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नॅशनल गाय कमिशनच्या म्हणण्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे शेण यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल. शेणापासून बनवलेला नैसर्गिक गॅस (CNG) हा पेट्रोलियम पदार्थांपेक्षा स्वस्त ठरेल. कमिशनचा हा सल्ला एक कागदपत्रात दिला असून, जे राष्ट्रीय गाय विज्ञान परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहे. 25 फेब्रुवारी रोजी ही परीक्षा होणार आहे. राष्ट्रीय कामधेनु आयोग किंवा आरकेएने 'गाय उद्योजकते'ला चालना देण्यासाठी, शेण सीएनजी पंप, बैल वीर्य बँक आणि गो पर्यटनासारख्या सूचना दिल्या आहेत.
डॉक्युमेंटमध्ये म्हटले आहे की, ‘बायोगॅस दीर्घ काळापासून इंधन म्हणून वापरला जात आहे. तो सिलिंडरमध्येही भरू शकतो आणि स्वयंपाकासाठी वापरला जाऊ शकतो. शेणापासून मिळणारी उर्जा वाहतुकीसाठीही वापरली जाऊ शकते. मोठ्या प्रमाणावर त्याचे उत्पादन घेऊन कोणीही सीएनजी पंप स्थापित करू शकतो. यामुळे परिवहन उद्योगाला स्वस्त आणि सहज उपलब्ध ‘मेड इन इंडिया’ इंधन उपलब्ध होईल.’ दरम्यान, देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. देशाच्या बर्याच भागात पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेली आहे.
याआधी, मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सांगितले की, ते आपल्या मंत्रालयाची सर्व वाहने इलेक्ट्रिक वाहनात रूपांतरित करणार आहेत. तेलाच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करता यावे यासाठी त्यांनी इतर विभागांनाही याचे पालन करण्यास सांगितले.