Murder Cases In India: भारतात 2022 मध्ये तब्बल 28,522 खुनाच्या गुन्ह्यांची नोंद; 70% पीडित पुरुष: NCRB
अहवालानुसार, 2022 मध्ये सर्वात कमी खून प्रकरणे असलेली शीर्ष पाच राज्ये सिक्कीम (9), नागालँड (21), मिझोराम (31), गोवा (44) आणि मणिपूर (47) आहेत.
NCRB Data: नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या वार्षिक गुन्हे अहवालातील आकडेवारीनुसार, देशात 2022 मध्ये एकूण 28,522 हत्येचे एफआयआर नोंदवले गेले. म्हणजेच देशात दररोज सरासरी 78 हत्या झाल्या. याचाच अर्थ देशात दर तीन तासांनी एका खुनाची घटना घडते. यापूर्वी 2021 मध्ये 29,272 आणि 2020 मध्ये 29,193 खुनाचे गुन्हे दाखल झाले होते. 2022 मधील हत्येचे आकडे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत कमी आहेत. अहवालानुसार, 2022 मध्ये सर्वाधिक 9,962 खून प्रकरणांमध्ये 'वाद' हे कारण होते. यानंतर 3,761 प्रकरणांमध्ये 'वैयक्तिक सूड किंवा शत्रुता' आणि 1,884 प्रकरणांमध्ये स्वतःच्या फायद्यासाठी हत्या करण्यात आल्या.
केंद्रशासित प्रदेशांमध्ये, 2022 मध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हत्येच्या 509 घटनांची नोंद झाली. पुद्दुचेरीमध्ये 30, चंदीगडमध्ये 18, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवमध्ये 16, अंदमान आणि निकोबार बेटे 7, लडाखमध्ये 5 आणि लक्षद्वीपमध्ये शून्य प्रकरणे नोंदवली गेली.
उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 3,491 हत्येचे एफआयआर दाखल करण्यात आले, त्यानंतर बिहार (2,930), महाराष्ट्र (2,295), मध्य प्रदेश (1,978) आणि राजस्थान (1,834) राज्ये आहेत. या प्रमुख पाच राज्यांमध्ये 43.92 टक्के खुनाच्या घटनांची नोंद झाली आहे. अहवालानुसार, 2022 मध्ये सर्वात कमी खून प्रकरणे असलेली शीर्ष पाच राज्ये सिक्कीम (9), नागालँड (21), मिझोराम (31), गोवा (44) आणि मणिपूर (47) आहेत. (हेही वाचा: Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार, बेछूट गोळीबारात 13 जणांचा मृत्यू)
खून झालेल्यांपैकी 95.4 टक्के प्रौढ होते. एकूण खून झालेल्यांपैकी 8,125 महिला आणि नऊ ट्रान्सजेंडर होते. यामध्ये सुमारे 70 टक्के बळी पुरुष होते. दुसरीकडे, 2022 मध्ये राजस्थानमध्ये 5399 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. जे देशात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. यापूर्वी 2020 आणि 2021 मध्ये राजस्थानमध्ये अनुक्रमे 5310 आणि 6337 बलात्काराच्या घटना घडल्या होत्या. बलात्काराच्या घटनांवर कारवाई करण्यातही राजस्थान खूप मागे आहे.