Mumbai to Goa by Road: कर्नाटक-गोवा NH4A हायवे विस्तारासाठी अनमोड घाट वाहतुकीसाठी बंद

गोवा-बेळगावला जोडणारा अनमोड घाट 19 नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo credits: PTI)

गोवा-कर्नाटकला जोडणारा अनमोड घाट 19 नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती बेळगावाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासंबंधितची एक नोटीस जाहीर करण्यात आली आहे. त्यात असे म्हटले आहे की,  NH4A या कर्नाटक-गोवा हायवेच्या विस्तारीकरणाचे काम सुरु असल्याने हा हायवे वाहतुकीसाठी बंद राहील. त्यामुळे वाहतुक चोरला किंवा अंबोली घाटाच्या दिशेने वळवली जाईल.

हलकी वाहने या मार्गावरुन प्रवास करु शकतात. मात्र अवजड वाहनांना फक्त बेळगाव-चंदागड-आंबोली-सावंतवाडी-गोवा मार्गानेच प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई-गोवा मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांसाठी ही समस्या असेल. कारण त्यांना अंबोली मार्गे किंवा चोरला घाट मार्गे प्रवास करावा लागेल.

राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि कर्नाटकच्या पीडब्ल्यूडी मंत्र्यांसह त्वरित बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. बेळगाव-गोवा विस्तार प्रकल्पाचा खर्च सुमारे 3000 कोटी रुपये आहे आणि हे काम दोन वर्षात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

NH4A हा बेळगाव-गोवा हायवे बंद राहिल्याने गोव्यातील नागरिकांना काहीसा त्रास सहन करावा लागणार आहे. फोंडा, धरबंदोर, सेंगुम तालुक्यातील रहिवाशांना या बंदिवासामुळे त्रास होणार असून बेळगावला प्रवास करावा लागणार असल्याने त्यांचा अधिक वेळ खर्च होणार आहे.