Mumbai: महिला फ्लाइट अटेंडंट ची Sexual Harassment केल्याचा आरोप,  बांगलादेशी नागरिकाला अटक

त्याचे स्वत:वर नियंत्रण नव्हते. तो केवळ तिच्याकडे जाऊनच थांबला नाही तर त्याने तिला मिठीत घेण्याचा आणि चक्क तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.

Flights | Representational image (Photo Credits: pxhere)

मुंबईमार्गे मस्कत-ढाक्का जाणाऱ्या विमानात महिला फ्लाईट अटेंडंटचा लैंगीक छळ (Sexual Harassment) केल्याच्या आरोपाखाली बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यास शेवटचे काहीच मिनीटे उरली असताना विस्तारा कंपनीच्या विमानात ही घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मोहम्मद धुलाल असे आरोपीचे नाव असून तो एका 30 वर्षांचा असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, विमानतळावर उतरण्यासाठी शेवटची 30 मिनीटे बाकी असताना आरोपी महिला फ्लाईट अटेंडंटच्या जागेजवळ गेला. त्याचे स्वत:वर नियंत्रण नव्हते. तो केवळ तिच्याकडे जाऊनच थांबला नाही तर त्याने तिला मिठीत घेण्याचा आणि चक्क तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही. तो इतर क्रू मेंबर्सकडेही गेला. त्याने त्यांच्यासोबतही आवेगात आक्षेपार्ह वर्तन करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला.

विमानाच्या कप्तानाने आरोपीला स्वत:वर नियंत्रण ठेवण्याचे अवाहन केले. अखेर त्याला इशारा देण्यात आला की, त्याच्यावर असभ्य आणि धोकादायक प्रवासी म्हणून कारवाई केली जाईल, असा निर्वाणीचा इशाराही देण्यात आला. त्यासाठी आवश्यक असणारे रेड वॉर्निंग कार्डही वाचण्यात आले. मात्र, तरीही आरोपी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो आपल्याच धुंदीत होता. त्यामुळे विमान लँड होताच, त्याच्यावर कारवाई करण्यात आली. शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

फ्लाईट अटेंडंटच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेतील विविध कलमांखाली प्राथमिक माहिती अहवाल म्हणजेच FIR दाखल केला आहे. आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे. त्याला स्थानिक कोर्टासमोर हजर केले जाणार आहे, असेही पोलीसांनी सांगितले आहे.