मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018: अस्थीकलशातून आणली अनामत रक्कम; भाजप उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधात असलेले भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आले असून, दोन्ही पक्षांनी विजयावर दावेदारी सांगितल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018: मध्य प्रदेशातील मैहर येथील भाजप आमदार आणि पक्षाचे उमेदवार नारायण त्रिपाठी यांच्या विरोधात पोलीसांनी भारतीय लोकप्रतिनिधित्त्व कायदा कलम १२५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्रिपाठी यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केले. भाजप उमेदवार जेव्हा आपले नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले तेव्हा, त्यांच्या हाता एक कलश होता. जो लाल रंगाने झाकलेला होता. या कलशाकडे पाहून लाकांची एकच गर्दी झाली. प्राप्त माहितीनुसार, भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण त्रिपाठी यांच्यासह सोबत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांकडे अशाच प्रकारचे कलश होते. हे अस्थिकलश असावेत असा उपस्थित लोकांचा समज झाल्याचेही प्रत्यक्षदर्शींचे म्हणने आहे.
त्रिपाठी यांचे हे वर्तन म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करताना धार्मिक वर्तन करुन लोकांना भावनिक साद घालण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सतना येथील रिटर्निंग ऑफिसर आणि मैहरचे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट एस के ध्रुव यांनीही त्रिपाटी यांचे वर्तन म्हणजे, आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर त्रिपाठी यांच्या विरोधात आचारसंहितेचे उल्लंखन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, आपण कोणतेही गैरवर्तन तसेच, आचारसंहितेचे उल्लंघन केले नाही. मात्र, विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून हा मुद्दा कारणाशीवाय ताणला जात आहे. तसेच, उपस्थितही केला जात असल्याची प्रतिक्रिया नारायण त्रिपाठी यांनी दिली आहे.(हेही वाचा, 'काँग्रेस, जेडीएसचा विजय! हे तर जनतेकडून दिवाळी गिफ्ट', कर्नाटक पोटनिवडणूक निकालानंतर सिद्धारमैय्या यांची प्रतिक्रिया)
दरम्यान, कोणतीही निवडणुक लढण्यासाठी उमेदवाराला कमीत कमी १० हजार रुपयांची रक्कम अनामत रुपात भरावी लागते. ही रक्कम भरण्यासाठी भाजप उमेदवाराने जनतेकडून एक एक रुपया लोकवर्गणीच्या रुपात जमा केला होता. जो त्यांनी अस्थीकलशाच्या रुपात आणला होता. ही रक्कम सुमारे १२ कलशातून आणल्याची माहिती आहे.