ऐकावे ते नवलच! तीन मुलांच्या आईने 19 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडशी पोलीस स्टेशनमध्ये केले लग्न, जाणून घ्या सविस्तर

त्यानंतर अखेर संमती घेऊन महिला व तरुणाचा विवाह झाला. सांगितले जात आहे की, महिला व या तरुणाचे गेल्या 6 वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

Marriage | (Image used for representational purpose only)

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधून (Lucknow) प्रेमविवाहाचे एक आगळेवेगळे प्रकरण समोर आले आहे. लखनऊमध्ये तीन मुलांची आई तिच्यापेक्षा 19 वर्षांनी लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात पडली. महिलेचे वय 45 वर्षे, तर तरुणाचे वय 26 वर्षे आहे. दोघांच्या अफेअरची संपूर्ण परिसरात चर्चा सुरू झाली. घरच्यांनी याचा विरोध केला, पण तरीही दोघे एकत्र राहण्यावर ठाम होते. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले व तेथे पोलिसांनी महिलेचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिले. पोलीस ठाण्यात झालेल्या या लग्नात पोलीस वराती झाले होते.

हे प्रकरण लखनौच्या रहिमाबाद (Rahimabad) पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. येथे राहणाऱ्या महिलेच्या पतीचे 15 वर्षांपूर्वी निधन झाले होते. महिलेला तीन मुले आहेत. मोठी मुलगी 23 वर्षांची, एक मुलगा 18 वर्षांचा आणि धाकटा मुलगा 14 वर्षांचा आहे. महिलेने या 26 वर्षीय तरुणावर लैंगिक शोषणाचा आरोप करत पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली होती. यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावले.

या आरोपाबाबत सलग दोन दिवस पंचायत चालली. त्यानंतर अखेर संमती घेऊन महिला व तरुणाचा विवाह झाला. सांगितले जात आहे की, महिला व या तरुणाचे गेल्या 6 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. एसओ रहीमाबाद कुलदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्नी देवी (45) सुरगौला येथे दोन मुले आणि एका मुलीसह राहते.  सुमारे 15 वर्षांपूर्वी पती सीताराम यांचा अपघाती मृत्यू झाला होता. मुन्नीचे सहा वर्षापासून गावातील मनोज कुमार उर्फ ​​भोला (25) याच्याशी प्रेमसंबंध आहेत. (हेही वाचा: Mother Elopes With Lover: काय सांगता? मुलीच्या लग्नाच्या 10 दिवस आधी प्रियकरासोबत पळून गेली आई; घरातील दागिने व पैसेही चोरले)

काही दिवसांपूर्वी मनोजचे लग्न जवळच्या गावात निश्चित झाले होते. याची माहिती मिळताच मुन्नीने सर्वप्रथम मनोजशी संवाद साधला, पण काही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर तिने मनोजच्या घरच्यांना प्रेमप्रकरणाची माहिती दिली व प्रकरण चिघळले. त्यानंतर मुन्नीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही पक्षांना बोलावले. गावातील लोकही जमा झाले. त्यानंतर दोघांच्या संमतीने पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या शिवमंदिरात या प्रेमी युगुलाचा विवाह झाला.