आज मान्सूनचे केरळात आगमन होणार; हवामान खात्याचा अंदाज
मात्र दोन दिवस उशिरा झाला असला तरी आज मान्सून केरळात दाखल होणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
उन्हाने तापलेल्या आणि त्रासलेल्या प्रत्येक देशवासियाला मान्सूनची प्रतिक्षा आहे. मात्र दोन दिवस उशिरा झाला असला तरी आज मान्सून केरळात दाखल होणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज केरळातील विविध भागात मान्सूनचे आगमन होईल. 9, 10 आणि 11 जून रोजी केरळातील त्रिशूर, एर्नाकुलम, मलप्पुरम, कोझिकोड जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसंच येत्या 48 तासांत मान्सूनचा जलद गतीने संचार होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
यापूर्वी मान्सून 6 जून रोजी केरळात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. मात्र नैऋत्य मान्सून वाऱ्यांची गती मंदावल्यामुळे मान्सून केरळात उशिराने दाखल होणार आहे.
मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर साधारणपणे त्या पुढील 8 दिवसांत महाराष्ट्रात वर्णी लावतो. त्यामुळे केरळातील आगमनानंतर संपूर्ण महाराष्ट्राला मान्सूनची प्रतिक्षा असेल. यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.