प्रत्येक गरीब कुटुंबाला मोफत LPG गॅस कनेक्शन; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
2016 मध्ये सुरु करण्यात आलेली ही उज्ज्वला योजना हळूहळू विस्तारीत होऊ लागली आहे.
मोदी सरकारच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत (Ujjawala Plan) सर्व गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन (Free LPG Connection) देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच गरीबांना मोफत एलपीजी गॅस उपलब्ध होईल. 2016 मध्ये सुरु करण्यात आलेली ही उज्ज्वला योजना हळूहळू विस्तारीत होऊ लागली आहे.
कॅबिनेट समितीने उज्ज्वला योजनेचा विस्तार करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. त्यामुळे ज्या गरीब कुटुंबांना या सेवेचा लाभ मिळाला नव्हता त्या सर्वांना आता मोफत एलपीजी कनेक्शनचा अवश्य लाभ मिळेल, असेही प्रधान यांनी सांगितले.
यापूर्वी 2011 च्या सामाजिक आणि आर्थिक जाती जनगणनेनुसार एलपीजी कनेक्शन देण्यात आलं होतं. त्यानंतर अनुसुचित जाती, मागासलेला समाज यांचा त्यात समावेश करण्यात आला. त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजना आणि अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला. पण या विस्तारीत स्वरुपामुळे सर्व गरीब कुटुंबांना एलपीजी कनेक्शन मोफत मिळेल, असे प्रधान यांनी सांगितले.
उज्ज्वला योजनेअंतर्गत केंद्र सरकार गॅस सिलेंडर जोडणीसाठी तेल कंपन्यांना 1600 रुपये सबसिडी देणार. मात्र ग्राहकांना शेगडी स्वतः खरेदी करावी लागेल. दारिद्र रेषेखालील कुटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचे मोदी सरकारच्या या योजनेचे लक्ष्य आहे. 2019 च्या लोकसभा निवडणूका जवळ आल्या असताना मोदी सरकारने गरीबांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.