Modi Cabinet Expansion: नव्या मंत्र्यांसह खातेवाटप जाहीर; Narayan Rane झाले सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री; जाणून घ्या कोणाला मिळाले कोणते मंत्रालय (See List)
यावेळी एकूण 43 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली गेली. नारायण राणे, सर्बानंद सोनोवाल यांच्या व्यतिरिक्त ज्योतिरादित्य सिंधिया आणि वीरेंद्र कुमार यांच्यासह 15 खासदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) केला. यावेळी एकूण 43 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली गेली. नारायण राणे, सर्बानंद सोनोवाल यांच्या व्यतिरिक्त ज्योतिरादित्य सिंधिया आणि वीरेंद्र कुमार यांच्यासह 15 खासदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. नव्या मंत्रिमंडळात 28 राज्यमंत्री आहेत. पंतप्रधान मोदींच्या दुसर्या कार्यकाळातील मंत्रिमंडळ विस्तारात असे 32 चेहरे आहेत ज्यांवर पहिल्यांदा केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पंतप्रधान म्हणून मे 2019 मध्ये मध्ये 57 मंत्र्यांसह दुसरा कार्यकाळ सुरू केल्यानंतर, मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळात प्रथमच फेरबदल केले व त्याचा विस्तार केला.
आता केंद्र सरकारने सर्व मंत्री व त्यांच्या खात्यांची विभागणी जाहीर केली आहे. वृत्तसंस्थेतील एएनआयच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची देखरेख करतील, तर अमित शाह गृह मंत्रालयासह मिनिस्ट्री ऑफ को-ऑपरेशनची देखरेखही करतील.
कोरोना साथीच्या संकटात आता मनसुख मंडाविया हे आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी सांभाळती. याआधी ती धुरा डॉ.हर्षवर्धन यांच्या खांद्यावर होती. मंडाविया यांना आरोग्यासह रसायन व खते मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
- धर्मेंद्र प्रधान– शिक्षणमंत्री
- अश्विनी वैष्णव- रेल्वेसह आयटी आणि दळणवळण मंत्री
- पीयूष गोयल- ग्राहक कल्याण मंत्रालयाबरोबरच वस्त्रोद्योग व वाणिज्य मंत्रालय
- हरदीपसिंग पुर- पेट्रोलियम मंत्रालयासह नगरविकास मंत्रालय
- स्मृती इराणी- महिला व बालविकास मंत्रालयासोबत स्वच्छ भारत मिशन
- ज्योतिरादित्य सिंधिया- नागरी उड्डाण मंत्रालय
- पुरुषोत्तम रुपाला- दुग्धशाळा आणि मत्स्यपालन
- नारायण राणे- सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री
- अनुराग ठाकूर- माहिती व प्रसारण मंत्रालय तसेच क्रीडा व युवा मंत्रालय
- गिरीराज सिंग- ग्रामविकास मंत्रालय
- पशुपती कुमार पारस- अन्न प्रक्रिया मंत्रालय
- भूपेंद्र यादव- पर्यावरण, वन व हवामान बदल आणि कामगार व रोजगार मंत्रालय
- कृष्ण रेड्डी- संस्कृती, पर्यटन आणि ईशान्य कार्य मंत्रालय
- मीनाक्षी लेखी- परराष्ट्र राज्यमंत्री
- किरेन रिजिजू- महत्त्वपूर्ण कायदा मंत्रालय (हेही वाचा: PM Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार- नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार यांना केंद्रात मंत्रिपदे; थोडक्यात जाणून घ्या कारणे)
दरम्यान, नियमांनुसार केंद्रीय मंत्रीमंडळात जास्तीत जास्त 81 सदस्य असू शकतात. पीएम मोदी यांनी 77 मंत्र्यांच्या पोर्टफोलिओचे विभाजन केले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात उत्तर प्रदेशचा मोठा वाटा आहे.