काँग्रेस ने वचननाम्यात दिलेल्या आश्वासनांचा पूर्तता करावी अशी माजी खासदार मिलिंद देवरा यांनी सोनिया गांधींकडे केली मागणी

महाविकासआघाडीतील तिसरा पक्ष काँग्रेस ने ही जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी मागणी काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी सोनिया गांधींकडे केली आहे.

Milind Deora And Sonia Gandhi (Photo Credits: IANS and PTI)

निवडणूका झाल्या की मतदारांची अवस्था 'गरज सरो आणि वैद्य मरो' अशी झालेली असते हे सर्वांनाच माहित आहे. निवडणूका दरम्यान मतांसाठी आश्वासनांचा पाऊस पाडणारे उमेदवार निवडणूक झाल्यानंतर दिलेली आश्वासनच विसरून जातात. असे अनेकांचे मत असते. मात्र 2019 च्या सत्तेत आलेल्या महाविकासआघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या आपण दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या मागे आहेत. त्यामुळे महाविकासआघाडीतील तिसरा पक्ष काँग्रेस ने ही जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी मागणी काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी सोनिया गांधींकडे (Sonia Gandhi) केली आहे.त्यासंदर्भातले पत्रच त्यांनी सोनिया गांधींना दिले आहे.

जनतेने आपल्यावरील दाखविलेला विश्वास कायम ठेवण्यासाठी निवडणुकीदरम्यान शिवसेना-राष्ट्रवादीकडून दिलेल्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता करण्याचे काम सध्या हे दोन्ही पक्ष करत आहेत. त्यामुळे काँग्रेसनेही वचननाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यास सुरुवात करावी, असं मिलिंद देवरा यांचं म्हणणं आहे.

हेदेखील वाचा- शिवसेनेनं जर उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू- अशोक चव्हाण

मार्च 2019 मध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक रॅली दरम्यान गरिबांना 500 स्क्वेअर फुटांचे घर देण्याचे आश्वासन दिले होतं. महाविकास आघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये या आश्वासनाचा समावेश करण्यात आला आहे, याची आठवणही देवरांनी पत्रातून करुन दिली आहे.

महाविकास आघाडी राज्यात चांगलं काम करत आहे. मात्र काँग्रेसकडून आश्वासनांची पूर्तता लवकर करण्यात यावी, अशी देवरांची मागणी आहे. केंद्रात काँग्रेसची सत्ता न आल्यामुळे लोकसभेला दिलेल्या आश्वासनाला ब्रेक लागला होता. परंतु राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसचा सहभाग असल्याने या आश्वासनांची पूर्तता करण्याची वेळ आली आहे, असं मिलिंद देवरा यांना वाटतं.