आपले धर्मांतर झाले नसल्याचे सिद्ध करण्याचा खटाटोप; सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यासाठी हिंदू तरुण करीत आहे 200 किमी पायी प्रवास

पोलिसांना या लोकांकडून अनेक नावे समजली होती ज्यांचे या लोकांनी धर्मांतर केले होते. मेरठचा (Meerut) रहिवासी प्रवीण कुमार यांचे नाव देखील या यादीत आले होते

Supreme Court of India | File Image | (Photo Credits: PTI)

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने फूस लावून इस्लाम (Islam) धर्म स्वीकारण्यास भाग पडण्याच्या आरोपाखाली काही लोकांना अटक केली आहे. पोलिसांना या लोकांकडून अनेक नावे समजली होती ज्यांचे या लोकांनी धर्मांतर केले होते. मेरठचा (Meerut) रहिवासी प्रवीण कुमार यांचे नाव देखील या यादीत आले होते. मात्र, आपले नाव चुकून पुढे आले आहे असा कुमार यांचा दावा आहे. यूपी एटीएसने त्यांना याबाबत क्लीन चिट दिली आहे, परंतु असे असूनही कुमार यांना आता सामाजिक बहिष्कारणासह इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

अशा परिस्थितीत, प्रवीण कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपली हरवलेली ओळख आणि सन्मान परत मिळवण्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत 200 किमी लांबचा प्रवास पायी करत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ते मेरठ ते दिल्ली पायी जात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करतील. या प्रवासात त्यांना मुसळधार पावसासह इतरही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रवीण कुमार हे पीएचडी स्कॉलर आहेत. धर्मांतर प्रकरणात त्यांना उत्तरप्रदेश एटीएसने गेल्या महिन्यात त्याच्या शीतला खेडा येथून चौकशीसाठी नेले होते.

त्यानंतर गावातील लोकांकडून त्यांना तिरस्काराचा सामना करावा लागत आहे. ते स्वत: ला हिंदू राष्ट्रवादी म्हणवतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर त्यांनी एक पुस्तकही लिहिले आहे. प्रवीण यांचे म्हणणे आहे की, 'मी कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे देशाला समजणे गरजेचे आहे.' (हेही वाचा: Health Ministry: वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रमांसाठी सरकारचा मोठा निर्णय, 'या' विद्यार्थ्यांना दिले आरक्षण)

त्यांच्या मते, त्यांच्या घराबाहेर 'दहशतवादी' आणि 'पाकिस्तानात जा' असे लिहून त्यांना त्रास दिला गेला आहे. प्रवीण कुमार ऊस गिरणीत अधिकारी आहेत. त्यांनी मंगळवारी आपला प्रवास सुरू केला आहे व हा प्रवास 11 दिवसात पूर्ण होईल, अशी त्यांना आशा आहे. ते म्हणतात, 'माझे नाव स्पष्ट करावे अशी मागणी मी सर्वोच्च न्यायालयाला करणार आहे. मला आशा आहे की यामुळे परिस्थिती बदलेल.' यूपी एटीएसने 23 जून रोजी प्रवीणच्या घरावर छापा टाकला होता.