Matrimonial Cruelty: नवऱ्याच्या इशाऱ्यानंतरही पत्नी रात्री उशिरा परक्या व्यक्तीशी फोनवर बोलायची; हायकोर्टाने दिला मोठा निर्णय
याबाबत पत्नीला जाब विचारला असता, पत्नीने सांगितले की, पतीपेक्षा या तिसऱ्या पुरुषाचा तिच्या शरीरावर आणि मनावर जास्त अधिकार आहे
केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) पती-पत्नीच्या नात्यासंदर्भातील एका प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. पतीने वारंवार इशारा देऊनही पत्नीने चोरून दुसऱ्या पुरुषाला फोन कॉल करणे, याबाबत पतीच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे हे वैवाहिक क्रूरतेचे (Matrimonial Cruelty) प्रमाण आहे, असे सांगून केरळ हायकोर्टाने एका जोडप्याचा घटस्फोट मंजूर केला. कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पतीने उच्च न्यायालयात अपील केले होते. पतीने याचिकेत घटस्फोटासाठी क्रूरता आणि व्यभिचाराचा हवाला दिला होता.
न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांनी आपल्या आदेशात असेही म्हटले आहे की, जोपर्यंत वैवाहिक जीवन पूर्ववत होत नाही, तोपर्यंत केवळ तडजोड करणे क्रूरतेचे समर्थन ठरणार नाही. न्यायालयाने म्हटले की, फोन कॉलबाबत दिलेले पुरावे हे महिला व्यभिचार करत असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही. दोन्ही पक्षांमधील संबंध चांगले नसून याआधीही ते तीन वेळा वेगळे झाले आहेत. अशा परिस्थितीत, पत्नीने तिच्या नातेसंबंधाबद्दल अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे होती, परंतु तिने तसे केले नाही. (हेही वाचा: Crime: प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढला, प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली हत्या, आरोपी अटकेत)
या जोडप्याचे संबंध यापूर्वीही चांगले नव्हते. 2012 मध्ये पत्नीने सासरच्यांवर अत्याचाराचा आरोप केला होता. याआधीही पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध असल्याचा संशय पतीला होता. महिलेचे लग्नापूर्वी ऑफिसमधील एका पुरुषाशी संबंध होते जे लग्नानंतरही कायम राहिले. परंतु न्यायालयाने व्यभिचाराचा खटला फेटाळून लावला आणि सांगितले की, पतीने पत्नी आणि या तिसर्या व्यक्तीला एकत्र पाहिले नव्हते, त्यामुळे ती व्यभिचार करत असल्याचे सिद्ध होण्यासाठी हे पुरावे पुरेसे नाहीत.
पतीने न्यायालयात सांगितले होते की, एकदा पत्नी आणि या तिसर्या व्यक्तीमधील खाजगी संभाषण त्याने ऐकले होते. याबाबत पत्नीला जाब विचारला असता, पत्नीने सांगितले की, पतीपेक्षा या तिसऱ्या पुरुषाचा तिच्या शरीरावर आणि मनावर जास्त अधिकार आहे. नवऱ्याने याबाबत तिला इशारा दिला परंतु पत्नीने त्या व्यक्तीशी बोलणे सुरूच ठेवले. कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, पत्नी दिवसातून अनेक वेळा तिसऱ्या व्यक्तीला फोन करत असे.कधी कधी तर ती त्याच्याशी रात्रीदेखील फोनवर बोल्याची. या प्रकरणाबाबत न्यायालयाने म्हटले आहे की, याला वैवाहिक क्रूरतेच्या श्रेणीत ठेवावे लागेल.