Man Dies During 'Smile Designing' Surgery: लग्नाआधी आपले 'हसणे' बदलण्याची डॉक्टरांकडे गेला तरुण; ‘स्माइल डिझायनिंग’ शस्त्रक्रियेदरम्यान झाला मृत्यू, हैदराबादमधील धक्कादायक घटना
त्यानंतर लक्ष्मी नारायण विंजमला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Man Dies During 'Smile Designing' Surgery: लग्न ही आयुष्यातील एक महत्वाची घटना आहे. प्रत्येकजणच आपल्या लग्नाची खूप मोठ्या प्रमाणात तयारी करत असतो. लग्नामध्ये सुंदर दिसणे ही वधुसह वराचीही इच्छा असते. मात्र हैदराबादमधील (Hyderabad) एका व्यक्तीला त्याच्या लग्नासाठी सुंदर दिसण्याचा प्रयत्न करणे अतिशय महागात पडले आहे. लग्नाआधी आपले ‘हसू’ बदलण्यासाठी होत असलेल्या शस्त्रक्रियेदरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यामध्ये ही घटना घडली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी सांगितले की, 16 फेब्रुवारी रोजी हैदराबादच्या जुबली हिल्स येथील एफएमएस इंटरनॅशनल डेंटल क्लिनिकमध्ये 'स्माइल डिझायनिंग' प्रक्रियेदरम्यान 28 वर्षीय लक्ष्मी नारायण विंजम याचा मृत्यू झाला.
लक्ष्मी नारायण विंजम याच्या वडिलांनी मुलाला भूल देताना ज्यादा डोस दिल्याने हा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. मुलाचे वडील रामुलू विंजाम यांनी सांगितले की, शस्त्रक्रियेदरम्यान त्यांचा मुलगा बेशुद्ध झाल्यानंतर डेंटल क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना क्लिनिकमध्ये बोलावले. त्यानंतर लक्ष्मी नारायण विंजमला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलाने या 'स्माइल डिझायनिंग' शस्त्रक्रियेबाबत आपल्याला कोणतीही माहिती दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. वडिलांनी आरोप केला की, आपल्या मुलाला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या नव्हती. आपल्या मुलाच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार आहेत. (हेही वाचा: Road Accident in Hyderabad: भीषण कार अपघातात एक ठार, चार जखमी)
जुबली हिल्स स्टेशन हाऊस ऑफिसर के वेंकटेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, 'लक्ष्मी नारायण 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.30 वाजता क्लिनिकमध्ये आला होता. दुपारी 4.30 च्या सुमारास त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले आणि सुमारे दोन तास ही प्रक्रिया चालली. संध्याकाळी 7 च्या सुमारास त्यांनी त्याच्या वडिलांना फोन केला आणि नंतर लक्ष्मी नारायणला ज्युबली हिल्स येथील अपोलो रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मुलाच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर क्लिनिकवर निष्काळजीपणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस रुग्णालयातील रेकॉर्ड आणि सुरक्षा कॅमेरा फुटेज तपासत आहेत.