Malvika Sood Joins Congress: अभिनेता सोनू सूदची बहिण मालविका सूदचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश; मोगा इथून मिळू शकते उमेदवारी

मिळालेल्या माहितीनुसार, यावर दोन्ही पक्षांची सहमती झाली असून, त्यानंतरच मालविकाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे

Malvika Sood (Photo Credit : Twitter)

अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) बहीण मालविका सूद (Malvika Sood) हिने काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या उपस्थितीत मालविका यांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी म्हणाले, ‘एका चांगल्या कुटुंबातील व्यक्ती आमच्या पक्षात येणे ही भाग्याची गोष्ट आहे.’ नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले, ‘सोनू सूद त्याच्या माणुसकीसाठी आणि दयाळूपणासाठी जगभरात ओळखला जातो आणि आज त्या कुटुंबातील एक सदस्य आमच्यात सामील झाला आहे.’

पंजाब विधानसभा निवडणुकीला फारच कमी अवधी शिल्लक असताना ही बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार पंजाबमधील विधानसभेच्या 117 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत मालविका सूदने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पंजाबमध्ये पक्ष अजून मजबूत होईल, असे मानले जात आहे. याआधी सोमवारी नवज्योत सिंग सिद्धू यांनी अभिनेता सोनू सूद आणि त्याची बहीण मालविका सूद सच्चर यांची मोगा येथील त्यांच्या घरी भेट घेतली.

मालविका सूद-सच्चर यांना काँग्रेस विधानसभा निवडणुकीत मोगा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, यावर दोन्ही पक्षांची सहमती झाली असून, त्यानंतरच मालविकाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या महिन्यात सोनू सूदने चंदीगडजवळ पत्रकार परिषद घेतली होते, ज्यामध्ये त्याने आपली बहीण मालविका निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. (हेही वाचा: India Lockdown Fact Check: YouTube वर लाॅकडाऊन बाबतीत व्हायरल होणाऱ्या बातम्या खोट्या, केंद्र सरकारने दिली माहिती)

दरम्यान, 38 वर्षीय मालविका सूद ही अभिनेता सोनू सूदची सर्वात लहान बहीण आहे. त्यांची मोठी बहीण मोनिका शर्मा अमेरिकेत राहते. संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेली मालविका मोगा येथे इंग्रजी कोचिंग सेंटर चालवते. यासोबतच तिने मोगा येथे शिक्षण, रोजगार आणि आरोग्य क्षेत्रात काम केले आहे. वडील शक्ती सागर सूद यांचे 2016 मध्ये आणि आई सरोजबाला सूद यांचे 2007 मध्ये निधन झाले. आई-वडिलांच्या स्मरणार्थ भावंडांनी सूद चॅरिटी फाउंडेशनची स्थापना केली आहे.