Male Prostitution Racket: जवळजवळ 4000 तरुणांची 'Gigolo' बनवण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूक; पोलिसांनी केला टोळीचा पर्दाफाश

पोलिसांनी या दोन आरोपींकडून एक डेस्कटॉप, एक लॅपटॉप, 4 मोबाईल फोन, एक हार्ड डिस्क, 2 एसडी कार्ड, 18 सिमकार्ड, 11 बँक खाती, 21 एटीएम कार्ड आणि चेकबुक जप्त केले आहेत.

प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

दिल्लीत हजारो तरुणांना जिगोलो (Gigolo) बनवण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी या संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिगोलो आणि एस्कॉर्ट सेवांमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून या टोळीने ऑनलाइन नोकऱ्या शोधणाऱ्या तरुणांना लाखो रुपयांनी  फसवले आहे. जिगोलोचा अर्थ पुरुष वेश्याव्यवसाय आहे.

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जवळजवळ 4000 नोकरी शोधणाऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. यातील बहुतांश पीडित तरुण समाजाच्या भीतीने आणि लाजेखातर गप्प बसले, तर काहींनी पोलिसांत तक्रार करण्याचे धाडस केले. सायबर स्टेशनचे एसएचओ रमन कुमार सिंह यांच्या पथकाने राजस्थानमधील जयपूर येथून दोन मुख्य आरोपी कुलदीप चरण आणि श्याम लाल यांना अटक केली आहे.

कुलदीप हा हॉटेलमध्ये रूम बॉय म्हणून काम करायचा, तर दुसरा आरोपी श्याम लाल हा हॉटेलच्या रिसेप्शनवर काम करायचा. दोघेही हिंदीसोबत अस्खलित इंग्रजी बोलतात. कुलदीप स्त्री आवाजात बोलू शकतो. तरुणांची दिशाभूल करण्यासाठी कुलदीप महिलेच्या आवाजात बोलत असे. फसवणूक झालेली रक्कम जमा करण्यासाठी या लोकांनी डझनभर बँकांमध्ये खाती उघडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील नरेला येथील एका व्यक्तीने सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, ऑनलाइन नोकरी शोधत असताना तो एका वेबसाइटवर पोहोचला. तिथे त्याने वेबसाइटवर नमूद केलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. (हेही वाचा: Couple Strangles Daughter: मुलीकडे सापडले प्रेग्नेंसी किट; आई-वडिलांनी गळा दाबून केली हत्या, अॅसिडने जाळला मृतदेह)

ज्या व्यक्तीने कॉल उचलला त्याने या व्यक्तीला जिगोलो बनण्यासाठी प्रशिक्षण देण्याची ऑफर दिली. यासाठी व्यक्तीकडून नोंदणी शुल्क म्हणून 2499 रुपये घेण्यात आले. त्यानंतर त्याच्याकडून अॅडव्हान्स कमिशन, पासकोड आणि मसाज किट देण्याच्या नावाखाली 39,190 रुपये घेतले. अखेर हा तरुण फसवणुकीला बळी पडला. याबाबत तक्रार आल्यानंतर सायबर पोलिस स्टेशनने एक टीम तयार करून दिलेल्या फोन नंबर आणि वेबसाइटची चौकशी सुरू केली. सायबर पोलिसांच्या टीमने डोमेन नेम आणि सर्व्हर स्पेस, कॉल डिटेल्स आणि मनी ट्रेल तपासले. यानंतर स्थानिक गुप्तचर आणि रेकीच्या माध्यमातून प्रथम कुलदीप आणि नंतर अन्य आरोपी श्याम लाल यांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी या दोन आरोपींकडून एक डेस्कटॉप, एक लॅपटॉप, 4 मोबाईल फोन, एक हार्ड डिस्क, 2 एसडी कार्ड, 18 सिमकार्ड, 11 बँक खाती, 21 एटीएम कार्ड आणि चेकबुक जप्त केले आहेत.