Major Changes in UPI Payment: कर भरण्यापासून ते व्यवहारापर्यंत, RBI ने युपीआयआमध्ये केले 'हे' दोन मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर
या दोन बदलतील एक म्हणजे, युपीआयद्वारे कर भरण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे आणि दुसरा म्हणजे नवीन ‘डेलिगेटेड पेमेंट्स’ फिचर.
Major Changes in UPI Payment: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने या आठवड्यात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्रणालीमध्ये दोन महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत, ज्याचा उद्देश युपीआयची पोहोच आणि क्षमता वाढवणे हा आहे. जाणून घेऊया या दोन्ही बदलांबाबत.
युपीआयद्वारे कर भरण्याची मर्यादा-
भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोख व्यवहार कमी करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून, महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. बँकेने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच युपीआयद्वारे कर भरण्याची कमाल मर्यादा 5 लाख रुपये केली आहे. यापूर्वी ही मर्यादा प्रति व्यवहार एक लाख रुपये होती.
या निर्णयामुळे उच्च मूल्याचा कर भरणाऱ्या करदात्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आता त्यांना एकाच व्यवहारात जास्त रक्कम भरण्याची सुविधा मिळणार आहे. या निर्णयामुळे डिजिटल पेमेंट अधिक लोकप्रिय होण्यास आणि देशातील डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत करण्यात मदत होईल.
डेलिगेटेड पेमेंट्स (Delegated Payments) फिचर-
दुसरा मोठा बदल म्हणजे युपीआयमध्ये सादर करण्यात आलेले एक नवीन ‘डेलिगेटेड पेमेंट्स’ नावाचे फिचर. या फिचरद्वारे तुमचे बँक खाते हे इतर कोणाला तरी म्हणजेच, तुमची मुले किंवा आईवडील यांना वापरायला देणे शक्य होणार आहे. तुम्ही तुमच्या बँक खात्यातून एका मर्यादेपर्यंत दुसऱ्याला युपीआय व्यवहार करण्याची परवानगी देऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी लिंक असणारे वेगळा युपीआय आयडी तयार करण्याची गरज नाही. *हेही वाचा: Jio Finance App in Paris: पॅरिसमध्ये लाँच झाले जिओ फायनान्स ॲप; फ्रेंच राजधानीतील निवडक पर्यटन स्थळांवर करू शकणार व्यवहार)
या फिचरद्वारे तुम्ही तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेला युपीआय आयडी वापरण्याची परवानगी इतर कोणाला तरी देऊ शकता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ही मर्यादा सेट करू शकता. मुलांसाठी आणि वृद्धांसाठी किंवा ज्यांचे बँक खाते युपीआयशी लिंक नाही त्यांना या फिचरचा फायदा होईल.