Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभेसाठी महाराष्ट्रात सुरु होणार BJP चा जोरदार प्रचार; पंतप्रधान मोदींच्या 8, गडकरींच्या 40, योगींच्या 15 सभांचे आयोजन
महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या.
महाराष्ट्रात पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Assembly Elections 2024) होत आहेत. निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासूनच राजकीय पक्षांमध्ये एकमेकांवर टीका करण्याचे सत्र सुरु झाले. यासोबतच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख संपल्यानंतर, बुधवारपासून निवडणूक प्रचाराला वेग आला. महाविकास आघाडी आणि महायुतीतर्फे बड्या नेत्यांच्या सभा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर बडे नेते महाराष्ट्रात अनेक जाहीर सभा घेणार आहेत.
अहवालानुसार, पंतप्रधान मोदी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एकूण आठ सभा घेणार आहेत. अमित शहा महाराष्ट्रात 20 सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे राज्यात जास्तीत जास्त जाहीर सभा घेणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात एकूण 15 जाहीर सभा घेणार आहेत. योगींव्यतिरिक्त भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार आहेत.
महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केली. यावेळी महाराष्ट्र निवडणुकीत पक्षांऐवजी दोन आघाड्यांमध्येच लढत पाहायला मिळणार आहे. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी आमनेसामने असणार आहेत. महाआघाडीत भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे.
यावेळी विधानसभा निवडणुकीत, विरोधी आघाडी (एमव्हीए) महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करू इच्छित आहे, ज्यामध्ये त्यांना महायुतीला चांगलीच टक्कर दिली होती. महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. मात्र, निवडणुकीनंतर शिवसेनेने एनडीएपासून फारकत घेत राष्ट्रवादी-काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. (हेही वाचा: Devendra Fadnavis On Amit Thackeray: अमित ठाकरे यांच्याबद्दल भाजपला उमाळा कायम; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची लालसा नाही)
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेसाठी काल, शेवटल्या दिवशी 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत 7, 995 उमेदवारांचे 10, 905 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. कालपर्यंत आलेल्या अर्जांची 30 ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन, 4 नोव्हेंबर 2024 रोजी अर्ज मागे घेता येईल.
(The above story first appeared on LatestLY on Oct 30, 2024 04:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

