Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यभरात स्थापन होणार 1 लाख 427 मतदान केंद्रे; आदिवासी आणि दुर्गम भागांतील मतदारांसाठी विशेष सुविधा, 'अशी' आहे तयारी

निवडणूक आयोगाने शहरी भागातील मतदाराची अनास्था विचारात घेऊन गृहनिर्माण संकुलात मतदान केंद्र उभारली आहेत तसेच ग्रामीण आणि आदिवासी भागातील मतदारांना मतदान केंद्राच्या जवळ लवकरात लवकर पोहोचता यावे यासाठी मतदान केंद्राची संख्या वाढवली आहे.

Election Voting प्रतिकात्मक प्रतिमा

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections 2024) निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात 1 लाख 427 मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्टीकोनातून राज्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यात 8 हजार 462 मतदान केंद्र आहेत. त्यानंतर मुंबई उपनगर येथे 7 हजार 579, ठाणे – 6 हजार 955, नाशिक – 4 हजार 922 तर नागपूर येथे 4 हजार 631 मतदान केंद्र आहेत.

निवडणूक आयोगाने शहरी भागातील मतदाराची अनास्था विचारात घेऊन गृहनिर्माण संकुलात मतदान केंद्र उभारली आहेत तसेच ग्रामीण आणि आदिवासी भागातील मतदारांना मतदान केंद्राच्या जवळ लवकरात लवकर पोहोचता यावे यासाठी मतदान केंद्राची संख्या वाढवली आहे.

महाराष्ट्रातील 241 विधानसभा मतदारसंघात मुख्य आणि सहायक मतदान केंद्रांची संख्या निश्चित केली आहे. यंदा राज्यात मुख्य मतदान केंद्र ही 1 लाख 186 असून त्यापैकी शहरी भागात 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 इतकी मतदान केंद्र संख्या राहणार आहे. सहायक मतदान केंद्रांची संख्या 241 इतकी आहेत. गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे मतदारांची सोय आणि मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित होईल. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रात पोहोचता यावे यासाठी बऱ्याच ठिकाणी आवश्यक रॅम्पची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे.

आदिवासी आणि दुर्गम क्षेत्रावर विशेष लक्ष-

यंदाच्या निवडणुकीत आदिवासी मतदारसंघ आणि दुर्गम भागांतील मतदारांसाठी विशेष सुविधा देण्यावर भर दिला आहे. गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, धुळे, आणि अमरावती जिल्ह्यात जेथे आदिवासी आणि दुर्गम भाग आहेत तेथे मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने मतदार सुविधांमध्ये सुधारणा केली आहे, जसे की मतदार सहाय्य केंद्रे,  मतदार हेल्पलाईन, आणि सूचना फलक यांचा समावेश आहे. तरुण मतदार, महिला मतदारांना लक्षात ठेवून हे उपाय योजले आहे.

सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्येही मतदान केंद्र-

शहरी भागांमध्ये जसे की मुंबई, पुणे, ठाणे सारख्या शहरामध्ये अतिउंच इमारती आणि सहकारी गृहनिर्माण संस्थामध्ये 1 हजार 181 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहे. तसेच झोपडपट्टीमध्ये 210 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहे. (हेही वाचा: Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभेसाठी महाराष्ट्रात BJP कडून होणार जोरदार प्रचार; उद्या Amit Shah आणि Yogi Adityanath यांच्या सभांचे आयोजन)

नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता-

निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेला अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मतदार आपले मतदान केंद्र शोधण्यासाठी ऑनलाइन पोर्टल आणि मोबाइल अॅप्स वापरू शकतात. मतदार जागरूकता मोहिमेंतर्गत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मतदारांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातील.