Madhya Pradesh: हत्या प्रकरणाची उकल करण्यासाठी बाबाची मदत, पोलीस अधिकारी निलंबीत; पाहा व्हायरल व्हिडिओ

एका हत्या प्रकरणाची उकल करण्यासाठी आणि आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी या उपनिरीक्षकांनी चक्क एका बाबाची मदत घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Baba Pandokhar Sarkar | (Photo Credit - Twitter)

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील छतरपूर (Chhatarpur ) येथील पोलीस अधीक्षक सचिन शर्मा यांनी सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) आणि लाईन संलग्न बमिठा पोलीस स्टेशन प्रभारी यांना निलंबित केले आहे. एका हत्या प्रकरणाची उकल करण्यासाठी आणि आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी या उपनिरीक्षकांनी चक्क एका बाबाची मदत घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतही हे एएसआय महाशय बाबांच्या एका कार्यक्रमात थेट मंचावर पोहोचले आहेत.

छतरपूर जिल्ह्यातील बामिठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओंटा पुर्वा गावात 28 जुलै रोजी एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत विहिरीत सापडला होता. या घटनेनंतर पोलिसांनी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून गावात राहणाऱ्या तीन तरुणांना ताब्यात घेतले होते. घटनेच्या दिवशी त्या तरुणांचे मोबाईल लोकेशन घटनास्थळी न सापडल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी करून नंतर त्यांना सोडून दिले.

दरम्यान, काही दिवसांनी पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे काका तीरथ अहिरवार याला भाचीचे कोणासोबत तरी अवैध संबंध असल्याचा संशय आल्याने त्याला अचानक अटक केली. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्याने तिची गळा आवळून हत्या केली. नंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला, असा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी ज्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास करून पीडितेचा काक तीरथला अटक केली, त्यामुळे कुटुंबीय आश्चर्यचकित झाले.

व्हिडिओ

दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये एएसआय अनिल शर्मा हे प्रकरण सोडवण्यासाठी बाबा पांडोखर सरकारची मदत घेत असल्याचे दिसले. ही बाब समोर येताच एसपी सचिन शर्मा यांनी एएसआय अनिल शर्मा यांना तत्काळ निलंबित केले आणि पोलिस स्टेशनचे प्रभारी पंकज शर्मा यांना तात्काळ निलंबित केले. याशिवाय या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि खून प्रकरणाची उकल करण्यासाठी एसपी शर्मा यांनी एक टीम तयार केली आहे.